कराचीत स्फोट, 2 चिनी इंजिनियर्स ठार
चीन बिथरला : पाकिस्तानला दिला इशारा
वृत्तसंस्था/ कराची
पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराचीमध्ये बलूच बंडखोरांनी चिनी ताफ्यावर पुन्हा मोठा हल्ला केला आहे. कराचीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक झालेल्या या आत्मघाती हल्ल्यात 2 चिनी नागरिकांचा मृत्यू झाला असून कमीतकमी 10 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील चीनच्या दूतावासाने अत्यंत कठोर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या पूर्ण प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करा आणि दोषींच्या विरोधात कठोर कारवाई करा असे चीनच्या दूतावासाने पाकिस्तानला बजावले आहे. बलूच लिबरेशन आर्मीच्या माजिद ब्रिगेडने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
चिनी नागरिक आणि प्रकल्पांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात यावी असे चीनने पाकिस्तानला सांगितले आहे. तर चिनी दूतावासाने स्वत:चे नागरिक आणि कंपन्यांना सुरक्षेच्या स्थितीवर बारकाईने नजर ठेवा आणि सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. चिनी इंजिनियर्स हे सिंध प्रांतातील एका ऊर्जा प्रकल्पासाठी काम करत होते अशी माहिती चिनी दूतावासाने दिली आहे.
बलूंचाचा चीनला इशारा
आमच्या आत्मघाती हल्लेखोराने एका वाहनात पेरण्यात आलेल्या स्फोटकांद्वारे स्फोट घडवून आणला आहे. चिनी इंजिनियर्सचा ताफा विमानतळातून बाहेर पडत असताना हा स्फोट घडविण्यात आला. या स्फोटात अनेक चिनी अभियंते आणि पाकिस्तानी जवान मारले गेले आहेत असा दावा बीएलएने केला आहे. एकूण 40 चिनी नागरिक कराची विमानतळावर पोहोचले होते. हा स्फोट स्थानिक प्रमाणवेळेनुसार रविवारी रात्री 11 वाजता घडला आहे. चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर अंतर्गत निर्माण होणाऱ्या ऊर्जा प्रकल्पात चिनी इंजिनियर्स काम करत आहेत.
पाकिस्तानातील बलुचिस्तानात चीनकडून अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. हा पूर्ण भाग खनिजसमृद्ध असून यावर चीनची नजर आहे. तर बलूच संघटनांकडून चीनच्या प्रकल्पांना विरोध दर्शविला जात आहे. बलुचिस्तानपासून दूर राहण्याचा इशारा बीएलएने चीनला दिला आहे.
यापूर्वी एप्रिल 2022 मध्ये कराची विद्यापीठानजीक बलूचांनी भीषण हल्ला करत 3 चिनी शिक्षकांना ठार केले होते. या हल्ल्यांमुळे चीन भडकला असून स्वत:चे सैनिक पाकिस्तानात तैनात करू पाहत आहे. यासंबंधी चीन आणि पाकिस्तान यांच्यात एक करारही झाला आहे.