शेअरबाजारात ब्लँक मंडे, शुल्क वादळाचा तडाखा
सेन्सेक्स 2226 अंकांनी पडझडीत :13 लाख कोटी बुडाले
वृत्तसंस्था/ मुंबई
ट्रम्प यांच्या शुल्क वादळाने सोमवारी भारतीय शेअरबाजाराला मोठा दणका दिला. बाजारासाठी सोमवार ब्लॅक मंडेच ठरला. सेन्सेक्स 2226 अंकांनी कोसळला तर गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी रुपये बुडाले.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक तब्बल 2226 अंकांनी कोसळत 73,137 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टीही 742 अंकांनी कोसळत 22161 अंकांवर बंद झाला. ही दुसरी सर्वात मोठी घसरण असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. आशियाई बाजारातही ट्रम्प शुल्काचा नकारात्मक परिणाम दिसून आला. 4 जून 2024 रोजी यापूर्वी शेअरबाजार 5.74 टक्के कोसळला होता. सोमवारच्या सत्रात पाहता 30 पैकी 29 कंपन्यांचे समभाग घसरणीत दिसून आले. टाटा स्टील, टाटा मोटर्स आणि लार्सन टुब्रो यांचे समभाग 7 टक्के इतके घसरणीत होते. झोमॅटोचे समभाग 0.17 टक्के वाढत बंद झाले. क्षेत्राच्या निर्देशांकात पाहता धातू निर्देशांक सर्वाधिक 6.75 टक्के इतका घसरला होता. त्यापाठोपाठ रियल्टी 5.69 टक्के इतका तर ऑटो, फार्मा, सरकारी बँका, ऑइल अँड गॅस व आयटी निर्देशांक 4 टक्के इतके घसरणीत होते.
कच्च्या तेलाच्या किमती कमालीच्या खाली आल्या आहेत. 2 एप्रिलपासून आजवर पाहता कच्च्या तेलाच्या म्हणजेच व्रुड ऑइलच्या किमती 12.11 टक्के इतक्या खाली आल्या आहेत. ब्रेंट व्रुड तेलाच्या किमती तर चार वर्षातील 64 डॉलर या नीचांकी स्तरावर पाहायला मिळाल्या.
कराचे घोंघावते वादळ
अमेरिकेने कर लादण्याची घोषणा केली असून विविध देश आता अमेरिकेवर कर लावण्याच्या प्रक्रियेत गुंतले आहेत. प्रत्युत्तर म्हणून चीनने 34 टक्के कर आकारणी जाहीर केलीय. करामुळे वस्तु महाग होणार असून लोकांकडून खरेदीत कपात केली जाणार आहे, ज्याने अर्थव्यवस्थेची गती मंदावण्याची भीती तज्ञांकडून व्यक्त केली जाते आहे.