दक्षिण आफ्रिकेच्या तुरुंगातून ‘ब्लेड रनर’ची मुक्तता
13 वर्षांपूर्वी प्रेयसीची केली होती हत्या
वृत्तसंस्था/ केपटाउन
दक्षिण आफ्रिकेतील ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिक अॅथलिट ऑस्कर पिस्टोरियसची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली आहे. 2013 मध्ये त्याने स्वत:च्या प्रेयसीची हत्या केली होती. यानंतर त्याला 13 वर्षांची शिक्षा झाली होती. शिक्षेचा कालावधी पूर्ण होण्यच्या 3 वर्षांपूर्वीच त्याला पॅरोल देण्यात आला आहे.
14 फेब्रुवारी 2013 रोजी ऑस्करने प्रेयसी रीवा स्टीनकॅम्पवर गोळ्या झाडल्या होत्या. ऑस्करने एका भांडणानंतर रीवाला ठार केल्याचा आरोप होता. तर घरात चोर घुसल्याचे वाटल्यामुळे चार गोळ्या झाडल्या होत्या, गैरसमजातून रीवावर गोळी झाडली होती असा दावा ऑस्करने स्वत:च्या बचावात केला होता.
2015 मध्ये 28 वर्षीय ऑस्कर पिस्टोरियसला स्वत:च्या 29 वर्षीय प्रेयसीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. रीवा हे पेशाने मॉडेल होती. पोलिसांना तिचा मृतदेह टॉयलेटमध्ये मिळाला होता. पिस्टोरियसला घटनास्थळावर अटक करण्यात आली होती. त्याचा डावा हात आणि शॉर्ट्स रक्ताने माखलेला होता.
ऑस्कर हा एक वर्षाचा असताना जेनेटिक डिफेक्टमुळे त्याचे दोन्ही पाय कापावे लागले होते. तो बालपणापासूनच प्रॉस्थेटिक लेग्सच्या (कृत्रिम पाय) मदतीने चालत आहे. ऑस्करने अॅथलेटिक्समध्ये मोठे नाव कमाविले होते. स्टीलपासून निर्मित ब्लेड्स प्रॉस्थेटिक्स लेग परिधान करून त्याने ब्लेड रनर हे नाव प्राप्त केले होते.
पॅरालिम्पिकमध्ये 6 सुवर्णपदके त्याने मिळविली होती. तसेच 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याने भाग घेतला होता. कृत्रिम पायांच्या मदतीने ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारा तो पहिला अॅथलिट ठरला होता. 400 मीटर शर्यतीत तो उपांत्य फेरीपर्यंत पात्र ठरला होता.