घुमटमाळ-हिंदवाडी येथील ब्लॅकस्पॉट हटविला
प्रभाग क्र. 29 मधील विविध ठिकाणचे आतापर्यंत 19 ब्लॅकस्पॉट हटविण्यात आले
बेळगाव : महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 29 मध्ये येणाऱ्या घुमटमाळ मारुती मंदिर दुसरा क्रॉस हिंदवाडी येथील ब्लॅकस्पॉट हटविण्यात आला आहे. यासाठी नगरसेवक नितीन जाधव यांनी पुढाकार घेत महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने ब्लॅकस्पॉट हटविल्याने स्थानिक रहिवाशांतून समाधान व्यक्त केले जात आहे. शहर व उपनगरात ठिकठिकाणी अद्यापही जिकडेतिकडे कचरा टाकला जात आहे. त्याचबरोबर ब्लॅकस्पॉटही निर्माण होत आहेत. घंटागाडी वेळेवर येत नसल्याने नागरिक रस्त्याच्या कडेला, तसेच खुल्या जागेवर कचरा टाकत आहेत. परिणामी ब्लॅकस्पॉट हटविण्याचे आवाहन महापालिकेसमोर उभे ठाकले आहे. प्रभाग क्र. 29 मधील विविध ठिकाणचे आजपर्यंत 19 ब्लॅकस्पॉट हटविण्यात आले आहेत. नगरसेवक नितीन जाधव यांनी आपला प्रभाव ब्लॅकस्पॉटमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. यावेळी अजय भाटिया, हर्षकुमार मोहिरे, कला भाटिया, अमित भाटिया, गंगाधर तुरमुंडी यांच्यासह महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण मोहिते, गजानन मुळीक यांच्यासह इतर उपस्थित होते.