शेअर बाजारात ‘ब्लॅक मंडे’
सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण : गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजारात सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 1,635.67 अंकांनी म्हणजेच 2.22 टक्क्यांनी घसरुन 71,947.55 अंकांवर बंद झाला. निफ्टी निर्देशांकामध्येही 488.20 अंकांची घसरण झाली. निफ्टी निर्देशांक 22,331.40 अंकावर बंद झाला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले आहेत. एकंदर, आठवड्याच्या सुरुवातीलाच दोन्ही भारतीय शेअर बाजारांमध्ये ‘ब्लॅक मंडे’ दिसून आला.
अमेरिका आणि आशियाई बाजारांमधील घसरणीचा भारतावर परिणाम झाला आहे. तसेच अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती प्रतिबॅरल 116 डॉलरपर्यंत वाढल्याचा परिणामही आशियाई बाजारांमध्ये दिसून आला. जपानचा निक्केई निर्देशांक 2.79 टक्क्यांनी घसरून 51,886 वर बंद झाला. दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक 2.97 टक्क्यांनी घसरून 5,277 वर बंद झाला. हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक 0.81 टक्क्यांनी घसरून 24,750 वर बंद झाला. मात्र, चीनचा शांघाय कंपोझिट निर्देशांक 0.24 टक्क्यांनी वाढून 3,923 वर बंद झाला.