घरगुती सिलिंडरचा काळा बाजार तेजीत
कोल्हापूर / विनोद सावंत :
घरगुतीसाठी वापर होत असलेल्या एलपीजी गॅस सिलिंडरचा काळाबाजार जोरात सुरू आहे. गॅस किट असणाऱ्या रिक्षासह अन्य वाहनासाठी बेकायदेशीररीत्या घरगुती सिलिंडरचा वापर केला जात आहे. अपुरे मनुष्यबळामुळे पुरवठा विभागालाही कारवाईमध्ये सातत्य ठेवण्यास मर्यादा आहेत. यामुळेच बेकायदेशीर गॅस भरणाऱ्यांचे व्यवसाय तेजीत आहेत.
घरगुती वापरासाठी एलपीजी गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. वास्तविक घरगुती सिलिंडरचा वापर घरगुती वापरा व्यतिरिक्त होता कामा नये. परंतू गॅस किटच्या वाहनामध्ये बेकायदेशीर घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस भरण्यात येत आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडून अशा व्यावसायिकांवर छापा टाकून कारवाई केली जाते. नुकतेच इचलकरंजी येथे वाहनांमध्ये बेकायदेशीररीत्या गॅस भरून देणाऱ्यावर कारवाई केली. संबंधितांवर गुन्हाही दाखल करण्यात आला. 11 सिलेंडरसह रोख कॅशही जप्त करण्यात आली. मागील आठवड्यामध्ये कोल्हापूर शहरातील सिद्धविनायक मंदिर लगत असणाऱ्या बेकायदेशीर गॅस भरणाऱ्यावरही अशाच प्रकारे कारवाई झाली. वास्तविक घरगुती गॅसमधून वाहनामध्ये गॅस भरणे धोकादायक असते. गॅसचा स्फोट होण्याचा धोका असतो. असे असतानाही संबंधित व्यक्ती स्वत:सह शेजारी असणाऱ्या लोकांच्या जीवाशी खेळत आहेत. असे व्यवसाय करणाऱ्यांवर वेसन बसण्यासाठी कडक कारवाई होण्याची गरज आहे. तसेच जिल्ह्यात सुरू असणाऱ्या बेकायदेशीर गॅस भरणा केंद्रांवर कारवाई झाली पाहिजे. तसेच पुन्हा त्यांच्याकडून हा व्यवसाय सुरू होऊ नये यासाठी कारवाईत सातत्य पाहिजे. परंतू जिल्हा पुरवठा विभागाकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने हे होऊ शकत नसल्याचे म्हणणे संबंधित अधिकाऱ्यांचे आहे.
- वरकमाईसाठी घरगुती सिलिंडरचा काळाबाजार
वास्तविक घरगुती सिलेंडरची विक्री इतरत्र होता कामा नये. परंतू गॅस वितरणामध्ये एक अशी यंत्रणा आहे की ती वरकमाईसाठी घरगुती गॅस सिलिंडराची विक्री वाहनांमध्ये गॅस भरण्यासाठी करते. तसेच फेरीवाले, हॉटेल्समध्ये कमर्शिअल गॅस सिलिंडरऐवजी जादा दराने घरगुती सिलेंडर दिले जाते. सध्या गॅस सिलिंडरमधील काळाबाजार तेजीत आहे.
- एका किलोमागे 20 रूपयांची कमाई
एलपीजी गॅस 70 रूपये किलो आहे. तर सीएनजी गॅस 91 रूपये किलो आहे. बेकायदेशीर गॅस भरणाऱ्याकडून गॅस घेतल्याने एका किलोमागे 20 रूपये कमी दराने गॅस मिळतो. त्यामुळे गॅस किट असणारे रिक्षा व्यावसायिकांसह काही चारचाकी चालकांचा कल एलपीजी गॅसऐवजी घरगुती गॅस घेण्याकडे आहे.
- वरदहस्त नेमका कोणाचा ?
कोल्हापुरातील सिद्धीविनायक गणेश मंदिर येथे झालेली कारवाई ही दुसऱ्यांदा झाली आहे. मागील कारवाई झाल्यानंतरही पुन्हा त्यांनी हा व्यवसाय सुरूच ठेवला होता. त्यामुळे अशा अवैध आणि धोकादायक व्यवसाय करणाऱ्यांवर नेमका वरदहस्त कोणाचा आहे, असा सवालही उपस्थित होत आहे.
अवैध गॅस सिलिंडर संदर्भात तहसीलदार आणि पुरवठा निरिक्षकांना कारवाईचे आदेश दिले आहेत. नागरिकांनी परिसरात कोणी अवैध गॅसचा वापर करत असल्यास त्याची माहिती पुरवठा विभागाला कळवावी. अशा व्यावसायिकांवर तत्काळ कारवाई केली जाईल.
मोहिनी चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी