‘वर्षा’वर काळी जादू
महाराष्ट्राच्या राजकारणात ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते मुख्यमंत्र्यांचे सरकारी निवासस्थान असल्याने तेथे अनेक राजकीय हालचाली होत असतात आणि राजकारणातील अनेक संकेतही मिळत असतात. या वर्षा बंगल्यावर महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अद्याप राहायला गेलेले नाहीत. त्याचे कारण अगदी साधे, सरळ व घरगुती असले तरी विरोधकांनी मुख्यमंत्री वर्षावर राहायला गेले नाहीत कारण तेथे काळी जादू करण्यात आली आहे व वर्षा बंगल्याच्या बागेत देवीला बळी दिलेल्या रेड्यांची शिंगे पुरली आहेत असा आरोप केला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रवत्ते आणि रोज ब्रेकफास्ट पत्रकार परिषद भरवून देदणादण ठाकरी भाषा वापरत भाजप आणि ठाकरेंना सोडून गेलेल्यावर आरोपांची धुळफेक करणारे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी आपल्या पोतडीतून ही माहिती बाहेर काढली आहे. ओघानेच या काळ्या जादूची उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या पिछेहाटीला रोजची बेछूट पत्रकार परिषद, टोमणे आणि विचारांशी फारकत आणि
ठाकरी भाषा असे म्हणत अनेकांचे केलेले उपमर्द कारणीभूत आहेत असे अनेक राजकीय पंडितांचे मत आहे. पण शिवसेना पराभवातून काही शिकली असे दिसत नाही. खरे तर वर्षा हा बंगला वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना आकारला गेला आणि त्याचे वर्षा हे नामकरण झाले. जिद्दीने आणि विचारधारेने राजकारण करणाऱ्या प्रत्येक नेत्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद आणि वर्षा हे निवासस्थान खुणावत असते. पण ते सर्वांना साधते असे नाही. हवामान खात्याची
वर्षा ही जशी बेभरवशाची असते तशी राजकारणातील केंद्र बनलेली ही वर्षाही बेजबाबदार असते. ओघानेच कायम चर्चेत राहते, मुख्यमंत्री बदलला की नवा मुख्यमंत्री आपणास सोईचे फर्निचर, हवे ते बदल, रंगरंगोटी करुन घेत असतो. शासनाचा प्रचंड पैसा खर्च होतो. वर्षावर अनेक बैठका होतात, खलबतं चालतात, महनीय व्यक्ती येतात, शिष्टमंडळे भेटतात, पाहुणचार होत असतो आणि या बंगल्याचा लाईट, पाणी, पाहुणचार यावर होणारा खर्च टिकेचा विषय होतो. वर्षावरचा गणेश उत्सव, वर्षावरचे आगमन, वर्षावरील मुक्काम याचे अनेक किस्से नेहमीच चर्चिले जातात. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार सोबत घेऊन गुवाहाटी, गोवा असा दौरा करुन मुख्यमंत्रीपद मिळवले तेव्हा प्रवासात त्यांनी कामाख्यादेवीचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले होते. पुढे या चाळीस पन्नास आमदारांची कामाख्याभक्ती व तिच्या दर्शनासाठीचे दौरे चर्चेत येत राहिले. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जात असले आणि महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मुलनासाठी मोठे काम झाले असले तरी ‘सुखी सोनाराकडे आणि दु:खी ज्योतिषाकडे’ या म्हणीची सर्वत्र प्रचीती येते. राजकारणी, बडे उद्योगपती, नवश्रीमंत आणि गुन्हेगार यांचे देव व बाबा ठरलेले असतात. राजकीय मंडळींच्या ज्योतिष कुंडल्या तपासणारे, त्यांना कोणता ग्रह आडवा आहे आणि कोणता मार्गी हे सांगणारे ज्योतिषी या नेत्यांच्या केंद्रस्थानी असतात. ते वेगवेगळे तोडगे, खडे, गंडे व प्रसाद देत असतात आणि वरवर काहीही चित्र दिसत असलं तरी ही मंडळी बुवाबाजीला साथ देतात. वर्षा बंगल्यावर बागेत कामाख्या देवीला बळी दिलेल्या रेड्याची शिंगे पुरली आहेत अशी माहिती संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही शिंगे देवेंद्र फडणवीस यांना वर्षावर येऊ देत नाहीत म्हणून शपथ घेऊन इतके दिवस झाले ते वर्षावर राहायला आले नाहीत अशी टिपण्णी त्यांनी केली आणि एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले. ओघानेच वर्षा पाडणार इथपर्यंत चर्चा गेली आणि शेवटी देवेंद्र फडणवीस यांनाच खुलासा करावा लागला की आपली मुलगी दहावीला आहे, तिने सांगितले ‘बाबा माझी परीक्षा होऊपर्यंत बंगला बदलू नका’ त्यामुळे वर्षावर राहायला गेलो नाही. परीक्षा झाली की शिफ्ट होणार असा खुलासा झाला व अगदी साधी, घरगुती माहिती पुढे आली. दिवसभर चॅनेलनी ही आणि या संदर्भातील बातम्या बडवल्या, अनेकांनी आपापल्या बुद्धीने त्यात भर घातली. पण या निमित्ताने राजकीय मंडळींची टेस्ट लोकांपर्यंत पोहचली. वर्षा बंगल्याचा इतिहास त्याचे बांधकाम, तेथील बगीचा, नामकरण या संदर्भात मधु मंगेश कर्णिक यांनी लिहले आहे. ते मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे प्रसिध्दी अधिकारी होते. त्याकाळात हा बंगला आकारला, पुढे अनेक मुख्यमंत्री झाले. त्यांच्या कथा या निवासस्थानाशी जोडल्या गेल्या. उद्धव ठाकरे अल्पमतात गेले तेव्हा वर्षा सोडतानाचा टेलिकास्ट झाला होता, रिटर्न मातोश्री वर भरपूर चर्चा झाली होती. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना वर्षावर शेतकरी राज्य असायचे. भाजी भाकरी सुरू असायची. एकनाथ शिंदेच्या काळात आदरातिथ्य खर्चावरुन टीका झाली होती. मनोहर जोशीसर, बाबासाहेब भोसले, शरद पवार, जनाब अंतुले, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे अनेकांच्या अनेक आठवणी या वास्तूशी निगडित आहेत पण या वास्तूत काळी जादू झाली, बळी दिलेल्या रेड्याची शिंगे तेथे बागेत पुरलीत, आपल्याशिवाय कुणी या वास्तूत येऊ नये म्हणून ही काळी जादू केलीय असा प्रकार घडला असावा असे वाटत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केल्याने यातील हवा निघून गेली आहे पण या निमित्ताने महाराष्ट्रातील राजकारणाचा खोल खोल गेलेला स्तर अधोरेखित झाला. काळी जादू हा शब्दप्रयोग बंगाली जादूला जोडला गेला आहे. इंडी आघाडीला बंगाली नेतृत्व असावे यावरून रेटारेटी सुरु आहे, ममता बॅनर्जी फिल्डिंग लावून आहेत. तेथे कुणाची जादू चालते आणि दिल्ली विधानसभा निकाल काय होतात यावरही केंद्रीय राजकारणात वेगवेगळे आखाडे बांधले जात आहेत. पण संजय राऊत यांनी वर्षावर काळी जादू, रेड्याची शिंगे पुरली असा आरोप करुन निर्माण केलेली हवा हास्यास्पद ठरली आहे. शिंगे पुरून किंवा शिंगे लावून कुणाला मुख्यमंत्री होता येत नाही इतके सर्वांना कळले तरी पुरेसे आहे.