महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गुजरातमध्येही ब्लॅक मॅजिक ‘बॅन’

06:06 AM Aug 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जादुटोणा प्रतिबंध विधेयक मंजूर :  अ. भा. अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या प्रयत्नांना यश

Advertisement

 महाराष्ट्र सरकारने 2013 मध्ये जादुटोणा आणि अघोरी प्रथा प्रतिबंधक कायदा लागू केला. आता गुजरात राज्यानेही असा कायदा विधानसभेत मंजूर केला आहे. पण हा कायदा आणण्यास या राज्याला महाराष्ट्राच्या तुलनेत 11 वर्षे अधिक लागली. अलिकडच्या काळात गुजरातमध्ये घडलेल्या अशा काही घटनांमुळे सरकारला हा कायदा करावा लागला. विधानसभेत सदर विधेयक मंजूर करून राज्यपालांकडे पाठविण्यात आले आहे.

Advertisement

गुजरात विधानसभेने एकमताने नरबळीची प्रथा नष्ट करण्यासाठी आणि राज्यातील इतर अमानुष आणि काळ्या जादूच्या प्रथा रोखण्यासाठी एक विधेयक मंजूर केले. गुजरात नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध विधेयक 2024 हे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सादर केले. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने या विधेयकाला पाठिंबा दिला. आता हे विधेयक राज्यपालांकडे संमतीसाठी पाठविले जाईल.

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीने यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध विधेयक 2013 सारखे विधायक असावे, अशी मागणी करण्यात आली होती. यासारखे कायदे कर्नाटक, ओडिसा, राजस्थान, छत्तीसगढ आणि आसाममध्ये लागू आहेत, याकडे लक्ष वेधण्यात आले होते. जनहित याचिकेच्या अनुषंगाने गुजरात सरकारने 23 जुलैला बैठक घेत नजीकच्या अधिवेशनात विधेयक ठेवले जाईल, असे न्यायालयाला कळविले होते.

नरबळी आणि गुन्हेगारांच्या हातून होणाऱ्या काळ्या जादूमुळे सामान्य लोकांचे शोषण होण्याच्या चिंताजनक घटना समोर आल्या आहेत. फेब्रुवारी 2023 मध्ये गुजरातमधील पोरबंदर रुग्णालयात एका मुलाला दाखल करण्यात आले होते. तापाने आजारी असलेल्या त्या मुलाच्या अंगावर स्थानिक बुवाकडून लोखंडाने डागणी दिल्याचे व्रण आढळले होते. तसेच एप्रिल 2023 मध्ये गुजरातच्या राजकोटमध्ये विंच्छिया गावात एका शेतकरी दांपत्याने (हेमू मकवाना-हंसा मकवाना) हवनकुंडात आपली मुंडकी पडतील, अशा पद्धतीने स्वत:चा शिरच्छेद करून घेतल्याचे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले होते. हा काळ्या जादुचाच प्रकार असल्याचे चौकशीत समोर आले होते. या दांपत्याने रिकामी पोत्यांचा वापर करून एक तात्पुरते मंदिर उभारले होते. त्या मंदिरात शिवप्रतिमा आणि मातीचे शिवलिंग याची पूजा केली जात असे.

अशा हानिकारक आणि अमानवीय प्रथांचे वाईट परिणाम आणि प्रसार प्रभावीपणे रोखण्यासाठी आणि त्यांचे उच्चाटन करण्यासाठी सरकारने कठोर सामाजिक आणि कायदेशीर उपाययोजना करणे आवश्यक बनले होते. सामान्य लोक आपल्या समस्या दूर करण्यासाठी अशा काळ्या करणीला (ब्लॅक मॅजिक) बळी पडतात. त्यात फसले जातात. लोकांच्या मनात परंपरेने ऐकलेल्या-पाहिलेल्या काही अशुभ कल्पना घर करून असतात. अशी मंडळी क्लेश-पीडा दूर करण्यासाठी बुवांच्या आहारी जातात. यात महिलांचे प्रमाण अधिक आहे. मात्र, अशा घटना घडून गेल्यावर जाग येते. तोपर्यंत आर्थिक आणि शारीरिक शोषण झालेले असते. फसवणुकीचे किंवा अत्याचाराचे प्रकार पुढे आल्यावर जनक्षोभ उसळतो. लोक बुवाबाजीला बळी पडून वैज्ञानिक, वैद्यकीय उपचारांपासून वंचित राहतात. गुजरातमधील नव्या विधेयकानुसार त्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास सहा महिने ते सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा आणि 5,000 ते 50,000 ऊपयांपर्यंत दंड ठोठावण्याची तरतूद आहे.

प्रस्तावित कायद्यांतर्गत राज्य सरकारला एक किंवा अधिक पोलीस ठाण्यांसाठी दक्षता अधिकारी म्हणून एक किंवा अधिक पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन पाहणे आणि अशा गोष्टींना प्रतिबंध करणे हे दक्षता अधिकाऱ्यांचे कर्तव्य राहणार आहे.

या कृत्यांना होणार प्रतिबंध

जादुटोणा प्रतिबंध विधेयक एखाद्या व्यक्तीच्या धार्मिक कृतींवर बंदी घालणारे नाही. कोणतीही धर्मावर श्रद्धा ठेवणारी व्यक्ती मंदिरात, चर्चमध्ये, मशिदीत जाते. त्यांच्या स्वातंत्र्याला कोणतीही बाधा येणार नाही. हा कायदा लोकांच्या भावनांचा गैरफायदा घेणाऱ्या बुवांसाठी आहे. एखाद्या व्यक्तीला दोरीने किंवा साखळीने बांधून मारहाण करणे, काठीने किंवा चाबकाने मारहाण करणे, पादत्राणे भिजवलेले पाणी पिण्यास लावणे, मिरचीचा धूर देणे, एखाद्याला छतावर लटकवणे, दोरीने बांधणे किंवा केस उपटणे, एखाद्या व्यक्तीच्या अवयवांना किंवा शरीराला तापलेल्या वस्तुचा स्पर्श करणे, एखाद्या व्यक्तीला उघड्यावर लैंगिक कृत्य करण्यास भाग पाडणे, भूत आणि डाकन (डायन) बाहेर काढण्याच्या बहाण्याने लघवी किंवा मानवी मलमूत्र जबरदस्तीने तोंडात टाकणे, एखाद्या व्यक्तीद्वारे तथाकथित चमत्कारांचे प्रदर्शन आणि त्याद्वारे पैसे कमविणे, तथाकथित चमत्कारांचा प्रचार आणि प्रसार करून लोकांना फसवणे आणि दहशत माजवणे, एखाद्या व्यक्तीला शारीरिक दुखापत करून वैद्यकीय उपचार घेण्यापासून प्रतिबंधित करणे आणि त्याऐवजी अमानुष, दुष्ट आणि अघोरी कृत्ये किंवा उपचार करण्याकडे वळविणाऱ्या इंद्रियांद्वारे अगम्य शक्तीचे भूत आहे, असा आभास निर्माण करणे, एखाद्या व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी देणे, काळी जादू किंवा अमानवी कृत्य करण्यास प्रवृत्त करून शारीरिक वेदना किंवा

आर्थिक हानी पोहोचविणे, कुत्रा, साप किंवा विंचू चावल्यास किंवा अन्य आजारात व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यास प्रतिबंध करणे, त्याऐवजी मंत्र-तंत्र किंवा अन्य गोष्टी देऊन उपचार करणे, बोटांनी शस्त्रक्रिया करण्याचा किंवा गर्भातील गर्भाचे लिंग बदलण्याचा दावा करणे, अलौकिक शक्तीद्वारे मातृत्वाची हमी देऊन गर्भधारणा करण्यास असमर्थ असलेल्या स्त्राrशी लैंगिक संबंध ठेवणे.

यांना प्रतिबंध नाही

हरिपाठ, कीर्तन, प्रवचन, भजन, प्राचीन आणि अभ्यासाचे शिक्षण, पारंपरिक विद्या आणि कलांचा प्रचार आणि प्रसार, दिवंगत संतांच्या चमत्कारांबद्दल सांगणे तसेच शारीरिक व आर्थिक नुकसान न करणाऱ्या प्रकारचे धर्मगुरुंचे चमत्कार सांगणे, आणि त्याचा प्रचार, प्रसार आणि साहित्याचे वितरण करणे तसेच घर, मंदिर, दर्गा, गुऊद्वारा, पॅगोडा, चर्च किंवा इतर धार्मिक स्थळांवर प्रार्थना, उपासना आणि धार्मिक विधी करणे, ज्यामुळे शारीरिक इजा किंवा आर्थिक नुकसान होत नाही. धार्मिक विधींनुसार लहान मुलांचे कान आणि नाक टोचणे, जैनांचे केशलोचन यांसारखे विधी.

  अ. भा. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्य

प्रा. श्याम मानव हे देशातील एक प्रमुख समाजसुधारक, विवेकवादी, लेखक आणि वक्ते आहेत. ते अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या भारतातील प्रदीर्घ काळ चालणाऱ्या अंधश्रद्धाविरोधी चळवळीचे संस्थापक आणि राष्ट्रीय संयोजक म्हणून प्रसिद्ध आहेत. सेल्फ हिप्नॉटिझमद्वारे व्यक्तिमत्व विकासाच्या क्षेत्रातही ते कार्यरत आहेत. सेल्फ-हेल्प हिप्नोथेरपीच्या क्षेत्रातील ते अग्रगण्य तज्ञ म्हणूनही ओळखले जातात. स्मृती-अभ्यास तंत्र, कौटुंबिक संबंध आणि बालविकास या विषयावरील त्यांच्या कार्यशाळा प्रभावी आहेत.

डॉ. दाभोलकर यांनी दिला दीर्घ लढा

डॉ. नरेंद्र दाभोलकर हे मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. अघोरी सामाजिक प्रथा व अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी ते अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संघटनेसोबत काम करू लागले. अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती 1982 मध्ये श्याम मानव यांनी स्थापन केली. मात्र, 1989 मध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नावाची वेगळी संघटना सुरू केली. डॉ. दाभोलकर यांची मंगळवार 20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी साडेसात वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरानजीक असलेल्या ओंकारेश्वर पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट ऊढी, परंपरा मोडीत काढण्यासाठी  लोकप्रबोधन करण्यात डॉ. दाभोलकर यांचे मोठे योगदान होते. महाराष्ट्र जादूटोणाविरोधी विधेयक विधिमंडळात मंजूर व्हावे, यासाठी डॉ. दाभोलकर कार्यरत होते. समाजातील अनेक भोंदू बाबांचे पितळ डॉ. दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सप्रयोग उघडे केले होते.

 

सरकारची महिलांसाठी भेट!

सरकारने महिलांना काळ्या जादूपासून वाचविण्यासाठी हा कायदा आणला आहे. कारण फसवणुकीच्या, वशीकरणाच्या अशा बहुतांश घटनांमध्ये मुख्य बळी महिलाच असतात. हे विधेयक म्हणजे गुजरातच्या महिलांसाठी भूपेंद्र पटेल सरकारची भेट आहे. या विधेयकामुळे लोकांच्या श्रद्धेला तडा जाणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे.

                                                                                                              -हर्ष संघवी, गृह राज्यमंत्री, गुजरात

 

  2008 मध्ये आले होते खासगी विधेयक

काँग्रेसचे उपनेते शैलेश परमार यांच्या म्हणण्यानुसार 2008 मध्ये तत्कालीन काँग्रेस आमदार कुंवरजी बावलिया यांनी अशाच तरतुदी असलेले खासगी विधेयक सभागृहात सादर केले होते. त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी या विषयावर अनेक कायदे लागू केले असल्याने असे विधेयक आणण्याची गरज नसल्याचे सांगितल्यानंतर हे विधेयक फेटाळण्यात आले. सध्याचे विधेयक 2008 मध्ये काँग्रेसने मांडलेल्या विधेयकासारखेच आहे.

 

                                  संकलन : राजेश मोंडकर, सावंतवाडी

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article