जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारालाच काळी गुढी बांधून सरकारचा निषेध
कर्जमाफी केली नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सरकारचा निषेध
कोल्हापूर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सध्या तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही, या वक्तव्यामुळे तसेच शक्तिपीठ महामार्गाला विरोध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी गुढी पाडव्यादिवशी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच काळी गुढी उभारून सरकारचा निषेध केला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अजय पोवार म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नसून ३१ मार्चच्या आत कर्ज भरण्याचा सल्ला दिला. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीआधी १०० दिवसांच्या आत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असल्याचे आश्वासन दिले होते. भाजपने काढलेल्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा उल्लेख होता. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन करून स्वत:चे व सरकारचे अपयश दाखवून दिले आहे. त्याबरोबरच सांगली व कोल्हापूर जिह्यातील शेतकरी व जनतेसाठी शक्तिपीठ महामार्ग हा कर्दनकाळ ठरणार आहे. या महामार्गामुळे जिह्यात महापुराचा धोका वाढणार आहे. यामुळे शेतीसह सामान्य नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त होणार आहे.
कार्यकर्ते सकाळी सात वाजताच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी सात वाजता हजर झाले. गुढीपाडव्यानिमित्त राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारने कर्जमाफीबाबत केलेली फसवणूक व कोल्हापूर, सांगलीच्या जनतेवर व शेतकऱ्यांवर ‘शक्तिपीठ’चे संकट येत आहे. या संकटाचा निषेध म्हणून काळी गुढी उभा करून सरकारचा जाहीर निषेध करण्यात आल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले.