For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ब्लॅक फ्रायडे : गुंतवणूकदारांचे 9 लाख कोटी बुडाले

06:58 AM Mar 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
ब्लॅक फ्रायडे   गुंतवणूकदारांचे 9 लाख कोटी बुडाले
Advertisement

सेन्सेक्स 1400 अंकांनी तर निफ्टी 488 अंकांनी घसरणीत

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

आशियाई बाजारातील घसरणीसोबतच भारतीय शेअर बाजारातील शुक्रवारचे सत्र मोठ्या पडझडीचे राहिले होते. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन महत्त्वाचे निर्देशांक जवळपास 2 टक्के इतके घसरणीत राहिले. बाजारात विक्रीवर मोठ्या प्रमाणावर भर दिसून आल्यामुळे गुंतवणुकदारांचे तब्बल 9 लाख कोटी रुपये एकाच दिवशी बुडाले आहेत.

Advertisement

शुक्रवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 1470 अंकांनी घसरत 74563 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांकदेखील 488 इतक्या विक्रमी अंकांनी घसरणीसोबत 23151 च्या स्तरावर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांक 1343  अंकांच्या घसरणीसोबत 53757 अंकांवर बंद झाला. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध दीर्घकाळ चालणार असल्याचे संकेत प्राप्त झाल्यानंतर याचे दूरगामी परिणाम भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी उमटल्याचे दिसून आले. आधीपासूनच घसरणीत असणाऱ्या शेअर बाजारात धातूच्या समभागांची विक्री दिसून आली. तसेच दिग्गज कंपन्यांचे समभागसुद्धा घसरणीत राहिल्याने त्यांनी बाजाराला आणखी खाली आणले. ब्रेंट क्रूड कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा 100 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. रुपयांच्या स्थिरतेबाबतही चिंता व्यक्त केली गेल्याने त्याचे परिणाम बाजारावर दिसून आले. ऑटो आणि धातू या क्षेत्रातील समभागांची विक्री मोठ्या प्रमाणात झालेली पहायला मिळाली. कंपन्यांच्या समभागांची कामगिरी पाहता एलअँडटीचा समभाग सर्वाधिक साडेसात टक्के घसरला होता. यासोबत आयटीसी, टायटन, एचसीएल टेक, विप्रो, इटर्नल, एसबीआय, टाटा मोटर्स, टीव्ही, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टिल, जिओ फायनान्स, मॅक्स हेल्थ केअर, अदानी एंटरप्रायझेस, नेस्ले इंडिया, इंडिगो, ओएनजीसी, आयशर मोटर्स, हिंडाल्को, अल्ट्रा टेक सिमेंट, श्रीराम फायनान्स, आयडीबीआय बँक, एसआरएफ, भारत फोर्ब्ज, हिंदुस्थान झिंक यांचे समभाग घसरले.

Advertisement
Tags :

.