Satara News : काळ्या कोळशाला आले सोनेरी दिवस!
गॅस टंचाईमुळे घराघरांत, हॉटेलांत पेटल्या कोळशाच्या शेगड्या
सातारा : होर्मुज जलडमरूमधील वाहतूक बंदीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन पुरवठा विस्कळीत झाला असून त्याचे परिणाम आता स्थानिक पातळीवरही जाणवू लागले आहेत. ऑईल टँकर जहाजे अडकून पडल्याने अनेक देशांमध्ये इंधन टंचाई निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातही व्यावसायिक गॅस पुरवठा मर्यादित करण्यात आल्याने हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.
या परिस्थितीत पर्याय म्हणून हॉटेल व्यावसायिकांनी कोळशावर चालणाऱ्या शेगड्यांकडे वळण्यास सुरुवात केली आहे. शहरातील अनेक हॉटेल्स, चहा टपऱ्या, चायनीज सेंटर आणि वडापाव गाड्यांवर सध्या कोळशाच्या शेगड्या पेटलेल्या दिसत आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे कोळशाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे कोळसा वखार मालकांसाठी सध्या सुगीचे दिवस आले आहेत.
घरगुती वापरासाठी लागणाऱ्या कांडी कोळशाचा दर प्रतिकिलो ४० ते ४५ रुपये इतका झाला आहे, तर भट्टीसाठी लागणाऱ्या मोठ्या कोळशाच्या ३० किलोच्या पोत्याला १००० ते ११०० रुपये भाव मिळत आहे. परिणामी, कोळसा वखारींवर ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.