भाजपचे हरियाणा, जम्मूतील यश ऐतिहासिक : तानावडे
काँग्रेसची परिस्थिती चिंताजनक असल्याची टीका
पणजी : काँग्रेस पक्षाने कितीही कांगावा आणि बदनामी केली तरी हरियाणात भाजप विजयाची हॅट्ट्रिक करणार याबद्दल पूर्ण विश्वास होता. हरियाणातील सुज्ञ आणि सुजाण नागरिकांनी तो विश्वास सार्थ ठरविला आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी केले. सध्या काँग्रेसची परिस्थिती चिंताजनक आहे, अशी टीकाही त्यांनी केली. मंगळवारी पणजीत भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी पक्षाचे सरचिटणीस दामू नाईक यांचीही उपस्थिती होती. या हॅट्ट्रिकसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच अन्य नेते आणि हरियाणातील नागरिकांचे गोवा भाजपतर्फे आम्ही अभिनंदन करत आहोत, असे तानावडे यांनी पुढे सांगितले.
गत महिन्याभरात ज्या प्रकारे काँग्रेसने स्वत:च्या विजयाचे वातावरण निर्माण केले होते, तसेच काही संस्थांनी वर्तविलेले अंदाज (एक्झीट पोल), हे सर्व काही फोल ठरले व दोन्ही ठिकाणी भाजपने बाजी मारली. राहूल गांधी यांनी विविध प्रकारचे आरोप करणे प्रारंभ केले होते. आजच्या निकालाने त्या सर्व आरोपांची उत्तरे त्यांना मिळाली आहेत. यापूर्वी 2022 मध्ये गोव्यातही या पक्षाने असेच वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न केले होते. तेव्हाही गोमंतकीयांनी त्यांना त्यांची जागा दाखविली होती, असे तानावडे म्हणाले. हरयाणामध्ये 49 मतदारसंघात तर जम्मू काश्मीरमध्ये 29 मतदारसंघात विजय मिळवून देत जनतेने ऐतिहासिक निकाल दिले आहेत. हे निकाल पाहता आता लवकरच होणाऱ्या महाराष्ट्र, झारखंड या राज्यांमधील निवडणुकीत आणि पुढील वर्षी बिहार, दिल्ली या राज्यामधील निवडणुकीतही भाजपच स्पष्ट बहुमताने विजयी होईल, असा ठाम विश्वास तानावडे यांनी व्यक्त केला.