दिल्ली मनपा पोटनिवडणुकीत भाजपचे यश
बारापैकी 7 जागांवर विजय : आम आदमी पक्षाला 3, काँग्रेसला 1 जागा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्ली महानगरपालिकेच्या 12 पोटनिवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने यश प्राप्त केले आहे. या पक्षाने सात प्रभागांमध्ये विजय मिळविला असून आम आदमी पक्षाला 3, काँग्रेसला 1 तर अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक पक्षाला 1 अशा जागा अन्य पक्षांनी जिंकल्या आहेत. दिल्ली महानगरपालिकेत 250 जागा असून भारतीय जनता पक्षाकडे 122 आहेत. या पक्षाला बहुमतासाठी चार जागा कमी आहेत. तथापि, अपक्ष आणि अन्यांच्या पाठिंब्यावर हा पक्ष सत्तेमध्येच आहे.
या पोटनिवडणुकांपूर्वी या 12 प्रभागांपैकी 9 भारतीय जनता पक्षाकडे होते. यावेळी त्याला दोन प्रभाग गमवावे लागल्याचे दिसून येत आहे. तरीही पक्षाने समाधानकारक यश मिळविल्याचे दिसून येत आहे. काही नगरसेवक दिल्ली विधानसभेवर निवडून आल्याने या पोटनिवडणुका घेण्याची स्थिती निर्माण झाली.
भाजप बहुमताच्या नजीक
दिल्ली महानगरपालिकेत आता भारतीय जनता पक्ष बहुमतच्या नजीक आला आहे. पक्षाकडे 250 जागांपैकी 122 जागा आहेत. आम आदमी पक्षाकडे 102 जागा असून इंद्रप्रस्थ विकास पक्षाकडे 16 जागा आहेत. काँग्रेसकडे 6 जागा असून अन्य पक्ष आणि अपक्षांकडे 4 जागा आहेत. भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमतासाठी 4 जागांची आवश्यकता आहे. या निवडणुकीत मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही. मतदानाची टक्केवारी केवळ 38.51 इतकीच आहे.
महत्वाचे विजय
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता ज्या प्रभागातून पूर्वी नगरसेविका होत्या. त्या शालिमार बाग ब प्रभागातून भारतीय जनता पक्षाच्या अनिता जैन या 10 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांनी काँग्रेसच्या बबिता राणा यांचा पराभव केला. रेखा गुप्ता यांनी दिल्लीचे मुख्यमंत्रीपद प्राप्त केल्यानंतर या प्रभागातील जागा सोडली होती. त्यामुळे येथे पोटनिवडणूक घ्यावी लागली आहे. याच पक्षाच्या उमेदवार मनिषा राणी यांनी द्वारका ब या प्रभागातून विजय मिळविला आहे. तर दिचांव कलान आणि ग्रेटर कैलाशमध्येही विजय मिळविला आहे. आम आदमी पक्षाने मुंडका आणि दक्षिणपुरी प्रभागात यश मिळविले.
फॉरवर्ड ब्लॉकचा प्रवेश
चांदनी महल प्रभागात विजय मिळवून अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाने प्रथमच दिल्ली महानगरपालिकेत प्रवेश केला आहे. काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर मुंडका हा प्रभाग आम आदमी पक्षाने भारतीय जनता पक्षाकडून खेचून आपल्याकडे घेण्यात यश मिळविले आहे.