For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपचे विधिमंडळात अहोरात्र धरणे

06:44 AM Jul 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
भाजपचे विधिमंडळात अहोरात्र धरणे
Advertisement

मुडा‘च्या गैरव्यवहारावर चर्चेचा प्रस्ताव फेटाळल्याने विरोधी पक्ष संतप्त

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

म्हैसूर नगरविकास प्राधिकरणातील (मुडा) अवैध भूखंड हस्तांतरणासंबंधी विधानसभेत चर्चा करण्यास सभाध्यक्ष यु. टी. खादर यांनी नकार दिल्यामुळे भाजप आणि निजदने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये अहोरात्र धरणे आंदोलन छेडले आहे.

Advertisement

सभागृहात ‘मुडा’च्या गैरव्यवहारासंबंधी चर्चेला मुभा न दिल्याने भाजप आणि निजदने अहोरात्र धरणे धरण्याचा इशारा दिला होता. सायंकाळी विधानसभा आणि विधानपरिषदेचे कामकाज पुढे ढकलल्यानंतर विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेत अहोरात्र धरणे आंदोलन सुरू केले. त्यापाठोपाठ विधानपरिषदेतही अहोरात्र धरणे धरण्यात आले आहे.

विधानसौधमधील कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार बी. वाय. विजयेंद्र म्हणाले, दलितांवर अन्याय होऊ देणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाला म्हैसूर नगरविकास प्राधिकरणाने दिलेले 14 भूखंड परत मिळाले पाहिजे. काँग्रेस सत्तेवर आल्यापासून 5 हजारहून अधिक भूखंड वाटप झाले आहेत. ते रद्द करावेत, अशी मागणी केली.

गरिबांसाठीचे भूखंड मनाला येईल तसे वाटप झाल्याविषयी सर्वसामान्यांकडून आम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यामुळे मुडाच्या भूखंड गैरव्यवहारावर सभागृहात चर्चा करण्यास पुढाकार घेतला तर कायदा मंत्री आम्हाला तपास आयोगाकडे जाण्यास सांगत आहेत. यापूर्वी सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना राज्यातील तपास आयोगाची परिस्थिती काय झाली, हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे, अशी टीका केली.

मुख्यमंत्री का पळवाट काढत आहेत, याचा उलगडा होत नाही. धाडस असल्याने ते या विषयावर चर्चेला मुभा देतील, असा विश्वास होता. मात्र, सिद्धरामय्या यांनी मौन बाळगले आहे. काही मंत्री मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेले होते, तेव्हा ते मंत्र्यांवर संतप्त झाले होते, अशी माहिती मला मिळाली आहे, अशी टिप्पणीही विजयेंद्र यांनी केली. ‘मुडा’च्या गैरव्यवहारासंबंधी चर्चा करण्यासाठी लक्षवेधी सूचना मांडली होती. मात्र, कायदामंत्री एच. के. पाटील यांनी तपास आयोग नेमला आहे, त्यापुढे जा, असे सांगितले आहे. ही बाब लोकशाहीची पायमल्ली आहे, असा आरोप विजयेंद्र यांनी केला.

विधानपरिषदेतही सदस्य आक्रमक

मुडामधील गैरव्यवहारात सहभागी असलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते चलवादी नारायणस्वामी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपच्या सदस्यांनी सभागृहातच अहोरात्र धरणे आंदोलन सुरू केले आहे.

गदारोळामुळे कामकाज तहकूब

म्हैसूर नगरविकास प्राधिकरणाच्या गैरव्यवहारासंबंधी विधानसभेत चर्चेला मुभा नाही, असे विधानसभा अध्यक्ष यु. टी. खादर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, त्यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांची मते जाणून घेत रुलिंग दिले. लक्षवेधी सूचनेंतर्गत या मुद्द्यावर चर्चेसाठी भाजपने सादर केलेल प्रस्ताव सभाध्यक्षांनी फेटाळला मुडाच्या गैरव्यवहारासंबंधी लक्षवेधी सूचनेंतर्गत चर्चा करता येणार नाही. त्याचप्रमाणे नियम-69 अंतर्गतही चर्चेला संधी नाही, असे सभाध्यक्षांनी स्पष्ट केले. त्यामुळे विरोधी आमदारांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे सभाध्यक्षांनी विधानसभेचे कामकाज 10 मिनिटे पुढे ढकलले.

Advertisement
Tags :

.