For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजपासून भाजपची खरी परीक्षा

07:00 AM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजपासून भाजपची खरी परीक्षा
Advertisement

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा दुसरा टप्पा आज होत आहे. या टप्प्यात 89 जागा आहेत. या टप्प्यापासून खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांच्या परीक्षेचा प्रारंभ होत आहे. कारण, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आजच्या टप्प्यासह पुढच्या सर्व पाच टप्प्यांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांना बहुसंख्य जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवायचे असेल तर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाही यांना मागच्या निवडणुकीतील कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागणार आहे. अन्यथा त्यांना फटका बसू शकतो. या दुसऱ्या टप्प्यात केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा इत्यादी राज्यांमध्ये मतदान होणार आहे. केरळमध्ये सर्व 20 मतदारसंघांमध्ये मतदान होणार असल्याने या राज्यातील मतदान प्रक्रिया या टप्प्यातच संपणार आहे. कर्नाटकामध्ये 28 मतदारसंघांपैकी 14 मतदारसंघांमध्ये मतदान होत असून त्यामुळे निम्मी मतदानप्रकिया या टप्प्यात पूर्ण होणार आहे. अनेक मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात थेट संघर्ष होत असल्याने दोन्ही पक्षांच्या दृष्टीने आतापासून अटीतटीचा संग्राम बघावयास मिळेल. म्हणूनच या दोन्ही पक्षांच्या महत्वाच्या प्रचारकांनी या टप्प्यासाठी प्रचाराचा धडाका लावल्याचे दिसून येत होते. या प्रचाराचे फळ कोणाला किती मिळणार, याचे उत्तर आज शुक्रवारी निर्धारित होत आहे...

Advertisement

मतदान वाढविण्यासाठी प्रयत्न

  • प्रथम टप्प्यात मतदान गेल्या निवडणुकीच्या तुलनेत कमी झाल्याने राजकीय पक्षांनी मतदान वाढविण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आपल्या प्रचार धोरणात योग्य ते परिवर्तन करुन कार्यकर्त्यांकरवी मतदारांना मतदानासाठी उद्युक्त केले जात आहे. निवडणूक आयोगानेही हवामान विभागाशी संपर्क करुन उष्णतेच्या लाटेची माहिती घेतली आहे आणि मतदानकेंद्रांवर अधिक सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. आयोगाने या संदर्भात पर्यावरण विभागाशीही चर्चा केली आहे.
  • अनेक महनीयांनी मतदारांना मतदानासाठी घराबाहेर पडण्याचे आवाहन पेले आहे. निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या प्रतिनिधींनीही सोशल मिडिया आणि इतर माध्यमांच्या द्वारे अधिकाधिक संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले असून प्रत्येक मतदारसंघातील उमेदवारही त्यादृष्टीने प्रयत्नशील आहेत. गेल्यावेळेपेक्षा कमी मतदान झाल्याचे अनेक अर्थ प्रत्येक विश्लेषकाने त्याच्या त्याच्या विचारसरणीनुसार लावले असून तो तीन-चार दिवस मोठ्या चर्चेचा विषय होता.

प्रचाराची दिशा...

Advertisement

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या टप्प्यामधील 89 मतदारसंघांमध्ये मिळून 28 प्रचार सभा घेतल्या आहेत. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी साधारणत: चौदा सभा घेतल्याचे दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा रोड शोमध्येही भाग घेतला. भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शहा यांनी 18 प्रचारसभांमध्ये भाषणे पेलेली आहेत, तर 12 रोड शो केले. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींनी 6 जागही सभांमध्ये भाषणे केली आहेत. भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा भर उत्तर भारत आणि कर्नाटकावर अधिक होता, तर काँग्रेसने केरळ आणि कर्नाटकावर लक्ष दिले होते. याशिवाय ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, नितीशकुमार आणि तेजस्वी यादव हे प्रचारात आघाडीवर असलेले इतर नेते असल्याचे दिसून आले.

वादग्रस्त मुद्द्यांचा परिणाम कितपत...

  • मतदानाच्या प्रथम टप्प्यात फारसे चर्चेत नव्हते, असे दोन वादग्रस्त मुद्दे दुसऱ्या टप्प्याच्या प्रचारकाळात समोर आले आहेत. एक, काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील संपत्ती सर्वेक्षण आणि पुनर्वाटपाचा मुद्दा आणि दोन, काँग्रेसचे सल्लागार मानले जाणारे आणि अमेरिकेत वास्तव्यास असणारे सॅम पित्रोदा यांनी उठविलेला ‘वारसा करा“चा वाद. या दोन्ही मुद्द्यांवर बरेच रण दुसऱ्या टप्प्यात माजले होते. या वादग्रस्त मुद्द्यांचा परिणाम मतदानावर होणार का, यावरही अनेक विश्लेषकांनी परस्पविरोधी मते व्यक्त केली आहेत. मतदार त्यांच्यावर नेमकी काय भूमिका घेतात, हे मतगणनेनंतरच, अर्थात 4 जूनला समोर येणार आहे.

भाजप-रालोआसाठी महत्व का...

  • मतदानाच्या प्रथम टप्प्यातील 102 मतदारसंघांपैकी भारतीय जनता पक्षाने केवळ 41 जागा गेल्या 2019 च्या निवडणुकीत जिंकलेल्या होत्या. तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील इतर पक्षांना 9 जागा होत्या. म्हणजेच, या आघाडीला निम्म्याहून कमी जागांची प्राप्ती झाली होती. मुख्य अंतर तामिळनाडूमुळे पडले होते. या राज्यातील सर्व जागांवर प्रथम टप्प्यात मतदान होते आणि 2019 च्या निवडणुकीत एकही जागा भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळाली नव्हती. त्यामुळे त्या टप्प्यात विरोधकांना तुल्यबळ जागा मिळाल्या.
  • दुसऱ्या टप्प्यात मात्र, ही निवडणूक सत्ताधारी प्रबळ असणाऱ्या प्रदेशांमध्ये प्रवेश करत आहे. केरळच्या 20 जागांचा अपवाद वगळता, सत्ताधाऱ्यांना ऊर्वरित 69 जागांपैकी 62 जागांवर, अर्थात साधारणत: 90 टक्के जागांवर यश मिळाले होते. काँग्रेसला 21 जागा मिळाल्या होत्या. या जागांमध्ये केरळमधील 20 पैकी 15 जागांचा समावेश होता. याचा अर्थ उरलेल्या 69 पैकी केवळ 6 जागांची कमाई झालेली होती. भारतीय जनता पक्ष, एकत्र शिवसेना, संयुक्त जनता दल, आसाम गणपरिषद आदी मित्रपक्षांनी चमकदार कामगिरी त्यावेळी केली होती.

लक्ष कर्नाटकाकडे...

  • दुसऱ्या टप्प्यात बहुतेक राजकीय विश्लेषकांचे लक्ष कर्नाटकाकडे लागून राहिले आहे. अनेक वृत्तसंस्था, टीव्ही वृत्त वाहिन्या आणि सोशल मिडिया वाहिन्यांचे प्रतिनिधी या राज्यात तळ ठोकून असून सर्वसामान्य माणसांशी बोलून त्यांच्या मनाचा कानोसा घेण्याचा प्रयत्न करीत होत्या. मतदानाच्या दिवशीही ही प्रक्रिया सुरु राहील. गेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने कर्नाटकातील आपली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करताना दुसऱ्या टप्प्यातील 14 पैकी 13 जागांवर यश प्राप्त केलेले होते. यंदा काय होणार हा सर्वांच्याच उत्सुकतेचा विषय आहे.

उत्तर प्रदेश, बिहार...

  • उत्तर प्रदेशातील आणखी आठ आणि बिहारमधील आणखी पाच मतदारसंघांमध्ये मतदान या टप्प्यात होईल. उत्तर प्रदेशातील आठडी जागांवर भारतीय जनता पक्षाने यश मिळविले होते. तर बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने निर्विवाद यश संपादन केले होते. मध्यप्रदेशातील सर्व सात जागांवर भारतीय जनता पक्षाने मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळविला होता. या पूर्ण प्रदेशामध्ये काँग्रेसच्या हाती एकही जागा लागली नव्हती. तसेच सध्याच्या विरोधी पक्षांच्या आघाडीचीही झोळी एक जागेचा अपवाद वगळता रिकामीच होती.

राजस्थानात मतदानाची समाप्ती

  • राजस्थानातील 12 मतदारसंघांमध्ये प्रथम टप्प्यात मतदान पूर्ण झालेले होते. आता ऊर्वरित 13 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. या दुसऱ्या टप्प्यासमवेत या राज्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे. गेल्यावेळी भारतीय जनता पक्षाने राज्यात निर्विवाद यश मिळविले होते. त्यामुळे हे राज्य यावेळीही या पक्षासाठी अत्यंत महत्वाचे मानले जात आहे. या राज्याच्या ‘शेखावती“ भागात भारतीय जनता पक्ष बळकट असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. मात्र, गेल्या दोन निवडणुकांमध्ये मिळालेले निर्भेळ यश यावेळीही मिळेल का, हा प्रश्न आहे.
Advertisement
Tags :

.