For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपची लोकप्रियता विरोधकांना खुपते

12:06 PM Feb 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
भाजपची लोकप्रियता विरोधकांना खुपते
Advertisement

प्रवक्ते गिरीराज वेर्णेकर यांची टीका

Advertisement

पणजी : अंत्योदय तत्वावरील लोकांपर्यंत पोहोचण्याची भाजप सरकारची कार्यपद्धती आणि त्यातून वाढती लोकप्रियता काही विरोधकांना खुपत असल्याने वेगवेगळी विधाने करून ते लोकांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न करत आहेत, असा आरोप भाजप प्रवक्ते गिरीराज वेर्णेकर यांनी केला. त्यातूनच भाजपच्या ’विकासित भारत’ धोरणास गालबोट लावण्याचे कामही ते करत आहेत, असेही ते म्हणाले. बुधवारी पणजीत भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी प्रदेश सचिव सिद्धेश नाईक आणि माध्यम विभाग प्रभारी प्रेमानंद म्हांबरे यांची उपस्थिती होती. काँग्रेसचे स्वत:चे दुकान बंद पडण्याच्या मार्गावर आहे आणि त्यांचे काही स्थानिक नेते इतरांच्या कार्याला नावे ठेवण्याचे प्रयत्न करत आहेत, याला काय म्हणावे, असा सवाल वेर्णेकर यांनी उपस्थित केला.

काँग्रेसची परिस्थिती सध्या एवढी वाईट आहे की त्यांच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनाच स्वत:च्या विजयाची खात्री नाही. त्यामुळे त्यांनी लोकसभा सोडून राज्यसभेचा मार्ग निवडला आहे, अशी टीका वेर्णेकर यांनी केली. दुसऱ्या बाजूने खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी आधी आपल्या आतापर्यंतच्या कार्याचा अहवाल जाहीर करावा, असे आव्हान त्यांनी दिले. काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी लोकशाही आणि अन्य मुद्यांवरून केलेल्या वक्तव्यासंबंधी विचारले असते, वेर्णेकर यांनी, पाटकर यांना स्वत: त्यांचा पक्ष आणि त्यांचे पदाधिकारीही गांभीर्याने घेत नाहीत, तेथे अन्य पक्षांसंबंधी त्यांनी केलेल्या वक्तव्यांची दखल का घ्यावी, असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देण्याचा प्रश्नच येत नाही, असे ते म्हणाले. आम आदमी पक्षाने दक्षिण गोव्यासाठी जाहीर केलेल्या उमेदवारासंबंधी विचारले असता, तो खरोखरीचाच उमेदवार आहे की नंतर काँग्रेससोबत सेटिंग करून त्याला माघार घेण्यास लावतील याबद्दल संशय असल्याचे ते म्हणाले. काँग्रेस आणि आप यांचे सध्याचे नाते म्हणजे ’मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर’ या उक्तीप्रमाणे आहे, असे वेर्णेकर म्हणाले.

Advertisement

’विकसित भारत विकसित गोवा’ संकल्पनेवर काम : नाईक

पत्रकार परिषदेत बोलताना सिद्धेश नाईक यांनी, हल्लीच झालेल्या काही राजकीय घडामोडी तसेच अर्थसंकल्प आणि अन्य मार्गातून दिसून आलेली सरकारची सकारात्मक धोरणे, लोकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविधांगी योजना यासंबंधी माहिती दिली. विकसित भारत विकसित गोवा 2047 संकल्पनेवर काम करणाऱ्या भाजप सरकारने गत दहा वर्षात केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला.

सरदेसाईंना भाजपप्रवेश नाहीच : वेर्णेकर

विजय सरदेसाई यांना पुन्हा भाजपमध्ये प्रवेश देण्याची सध्यातरी कुणाचीही तयारी नाही, असे वेर्णेकर यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.