For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपचे डाव चुकू लागले

06:19 AM Nov 06, 2023 IST | Tarun Bharat Portal
भाजपचे डाव चुकू लागले
Advertisement

भाजपला दम लागलेला दिसत आहे. काल परवापर्यंत जगातील आपण सर्वात मोठा पक्षच केवळ नसून कोणतीही निवडणूक असो विरोधकांचे आपण चिपाड बनवतो या तोऱ्यात असलेले सत्ताधारी सध्यातरी बरेच नरमलेले दिसत आहेत. पाच राज्यांतील निवडणूक प्रचार त्यांच्या मनाप्रमाणे चाललेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात पहिल्यासारखा जोर दिसून येत नाही किंवा त्यांचा त्वेष फसवा वाटत आहे. कोठेतरी भट्टी बिघडली आहे. ती ठीक करायच्या मागे ते तसेच गृहमंत्री अमित शहा लागलेले आहेत.

Advertisement

शहा यांनी गेल्या आठवड्यात मध्यप्रदेशचा तीन दिवसांचा दौरा केला तो मुख्यत्वे करून बंडखोर उमेदवारांना बसवण्यासाठी. राज्यात भाजपचे निवडणूक प्रमुख असलेले केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची डाळ न शिजल्याने साक्षात शहा यांना या ‘शांती’ मोहिमेवर पडावे लागले यातच श्रेष्ठींचा वचक किती कमी झाला आहे ते दिसून येते. प्रसारमाध्यमे पाचही राज्यात भाजप आणि काँग्रेसची कडवी टक्कर आहे असे चित्र दाखवत असले तरी त्यात दोन्ही बाजूंकडून जाहिराती लाटून स्वत:ची चांदी करायचा भागच जास्त हे मोदी-शहांनी ओळखले आहे. वारा पिलेल्या वासराप्रमाणे काँग्रेस प्रचारात उधळत असल्याने राज्यकर्ते केवळ अवाकच झालेले नाहीत तर ही संकटाची नांदी आहे असे समजून कामाला लागले आहेत. काँग्रेसला जास्तीत जास्त नुकसान कसे होईल अशी रणनीती बांधली जात आहे.

तेलंगणाचेच उदाहरण घेतले तर काय दिसते. भाजप सत्तेच्या स्पर्धेतून बाहेर फेकली गेलेली आहे. तिथे तिसऱ्यावेळी मुख्यमंत्री बनण्याचा प्रयत्न करत असलेल्या भारत राष्ट्र समितीच्या के चंद्रशेखर राव आणि काँग्रेस यात जंगी टक्कर दिसत आहे. भाजपला केवळ दोन टक्के मते मिळाली तरी खूप आहेत असा दावा करून राहुल गांधी त्याची जाहीर टर उडवत आहेत. भाजपचे एक आघाडीचे रणनीतीकार असलेल्या माजी खासदार विवेकानंद यांनी पक्षाला राम राम ठोकून काँग्रेसमध्ये नुकताच घेतलेला प्रवेश बरेच काही बोलून जातो. काँग्रेसच्या सभांना होत असलेली प्रचंड गर्दी आणि चंद्रशेखर राव यांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे तेलंगणात वारे बदलत आहे असाच संकेत देत आहे. राव देखील कच्च्या गुरुचे चेले नसल्याने त्वेषाने कामाला लागले आहेत. थोडक्यात काय तर ‘अब आयेगा मजा’ असे चित्र दिसत आहे.

Advertisement

राजस्थानमध्ये भाजपच्या हातात आलेला खेळ उधळला जाणार काय या भीतीने सत्ताधाऱ्यांना ग्रासले आहे. वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार न बनवण्याचा निर्णय भाजपच्या अंगलट आल्याने त्यांना सरतेशेवटी तिकीट देणे मोदी-शहा यांना भाग पडले. तसेच काहीसे मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये झाले आहे. भाजपचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री असलेल्या शिवराज सिंग चौहान यांना तसेच छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री असलेल्या रमण सिंग यांना नाराज करण्याचे पहिल्यांदा काम करून पक्षाने आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. झाला गेला प्रकार निस्तरण्यासाठी भाजप ‘अगा काही घडलेच नाही’ असे आता दाखवत आहे. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण? हा मुद्दाच सध्यातरी बासनात टाकला गेला आहे. पहिल्यांदा आपण निवडणूक तरी जिंकू असे याला उशिरा सुचलेले शहाणपण देखील कोणी मानू शकते.

राजस्थानमध्ये अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात दिलजमाई करण्यात काँग्रेस श्रेष्ठींना आलेल्या यशाने काँग्रेस मोठ्या आत्मविश्वासाने मैदानात उतरली आहे. गेहलोत यांनी सुरु केलेल्या विविध कल्याणकारी योजनांमुळे त्यांनी विशेषत: महिलात आपला चाहता वर्ग निर्माण केला आहे. जर या वर्गाची साथ राहिली तर दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची तेथील लोकांची सवय बदलली जाऊ शकते असा आशावाद काँग्रेसमध्ये आहे. छत्तीसगढ काँग्रेसकडे जाणार अशी चर्चा भाजपाई करू लागले आहेत. अलीकडील काळात राजस्थानच्या राजकारणातील सर्वात मोठा नेता असा गेहलोत यांचा दबदबा झाला असताना भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारच घोषित न केल्याने काँग्रेसला मदतच केलेली आहे. राजस्थानमध्ये गेहलोत विरुद्ध मोदी असा सामना आहे असा प्रचार काँग्रेसने खुबीने सुरु केला आहे. कर्नाटकमधील पराभवाबाबत ब्र न काढलेल्या मोदी-शहा यांना हवा बदललेली आहे/बदलत आहे याचा वास लागल्याने सर्व तऱ्हेने डागडुजी करण्याचे काम त्यांनी सुरु केले आहे. म्हणूनच प्राप्त परिस्थितीत विजयश्री खेचून आणण्यासाठी त्यांनी आकाश पाताळ एक करणे सुरु केले आहे. काँग्रेसची संभावित ‘कमजोर कडी’ असलेल्या उमेदवारांना आत्ताच गाठले जात आहे. कोणत्याही राज्यात ‘ऑपरेशन कमळ’ करून भाजपचे सरकार कसे आणले जाईल याविषयी योजना आखणे सुरु झाले आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत खेळण्याची मोदी-शहा यांनी नेहमीच चिकाटी दाखवल्याने त्यांचे कट्टर विरोधक/टीकाकार  देखील त्यांचे कौतुक करताना दिसतात.

गेल्या आठवड्यात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने जातीनिहाय जनगणनेच्या ज्वलंत मुद्यावर प्रत्येक राज्यातील प्रमुख नेत्यांची बोलावलेली बैठक म्हणजे विरोधकांच्या या विषयावर सुरु झालेल्या जंगी मोहिमेने सत्ताधारी किती चिंतीत झाले आहेत हे दाखवते. भाजपने आत्तापर्यंत या मुद्याला येनकेन प्रकारे केराची टोपली दाखवलेली आहे पण आता शहा हे जाहीर सभांतून भाजप अशा जनगणनेच्या विरुद्ध नाही असे सांगत सुटले आहेत. आपण स्वत: मागासवर्गीय समाजातील असून या समाजासाठी कटिबद्ध आहोत. या समाजासाठी काँग्रेसने काय केले? असे प्रश्न पंतप्रधान विचारत आहेत. या सर्वांचा अर्थ विरोधकांचा जमालगोटा लागू पडलेला आहे. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सरकारची तारांबळ होत असताना देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत भाग घेतला हे विशेष होय. हिंदुत्वाचा हुकुमाचा एक्का भाजपच्या हातात असताना मागासवर्गीयांचा मुद्दा पुढे करून आपल्या प्रभुत्वाला सुरुंग लावण्याचे सुरु झालेले काम कसे उलटवावयाचे ही चिंता सध्या सत्ताधाऱ्यांना सतावत आहे.

मिझोराममधील निवडणूक प्रचारापासून पंतप्रधान दूर राहिल्याने भाजपच्या हातून तिथे डाव सुटलेला आहे असाच संदेश गेलेला आहे. मिझोराम हा ख्रिस्ती समाजाचे बाहुल्य असलेला पूर्वोत्तरेकडील प्रदेश. गेले चार महिने मणिपूर जळत असताना देखील पंतप्रधान तिकडे फिरकले नसल्याने त्याला लागून असलेल्या मिझोराममध्ये तो मुद्दा बनला नसता तरच नवल ठरले असते. मिझो नॅशनल फ्रंटचे नेते आणि रालोआचे सदस्य असलेल्या मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी पंतप्रधानांबरोबर आपण एका व्यासपीठावर येणे शक्य नाही असे स्पष्ट करून भाजपला घरचा आहेर दिलेला आहे. त्यानंतर राजनाथ सिंग यांना तिकडे प्रचारासाठी पिटाळण्यात आले. मणिपूरमध्ये शेकडो चर्चेस जाळण्यात आलेली आहेत अशावेळी लोक क्रुद्ध झाले आहेत. त्यामुळे भाजप आणि पंतप्रधानांनी आपापला प्रचार करावा अशा कानपिचक्या मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.  राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये सुरु झालेल्या ईडीच्या धाडी म्हणजे सत्ताधारी साम दाम दंड भेद असे सारे प्रकार विरोधकांना नमवण्यासाठी वापरू लागले आहेत असे मानले जाते.

सुनील गाताडे

Advertisement
Tags :

.