For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपचा ‘मास्टरस्ट्रोक’ एका दगडात तीन पक्षी!

06:23 AM Jun 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
भाजपचा ‘मास्टरस्ट्रोक’ एका दगडात तीन पक्षी
Advertisement

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत शेवटच्या दिवशी एक नाट्यामय घडामोड पाहायला मिळाली. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे शिवसेनेचे उमेदवार बाळ माने यांनी थेट मंत्री नीतेश राणे यांच्यासोबत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. या एकाच खेळीमुळे महायुतीचे अनिकेत तटकरे बिनविरोध विजयी झालेच, त्याचबरोबर भाजपने आखलेल्या रणनीतीनुसार नीतेश राणेंनी या ‘मास्टरस्ट्रोक’द्वारे एका दगडात तीन पक्षी मारले असून ठाकरे सेनेला मोठा राजकीय धक्का दिला. शिंदे सेनेच्या वर्चस्वालाही ब्रेक लावत भाजपची ताकद वाढविण्याची मोठी खेळी खेळली आहे.

Advertisement

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी अचानक माघार घेतल्यामुळे महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गटाचे उमेदवार अनिकेत तटकरे हे बिनविरोध निवडून आले आहेत. या संपूर्ण राजकीय नाट्यात भाजप नेते आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांची भूमिका महत्त्वाची ठरली असून त्यांनी आखलेल्या रणनीतीमुळे कोकणातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.

बाळ माने यांच्या माध्यमातून रत्नागिरीमध्ये ठाकरेसेनेचा पक्ष हळूहळू उभारी घेईल, या विश्वासाने उद्धव ठाकरे यांनी मोठ्या विश्वासाने बाळ मानेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. मात्र, भाजपने खेळी करत ऐनवेळी त्यांना माघार घ्यायला लावून नीतेश राणेंनी ठाकरे सेनेला कोकणात बॅकफूटवर आणण्याची पहिली राजकीय खेळी खेळली. लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे सेना आधीच कमकुवत झाली होती. त्यात आता आणखी एक मोठा राजकीय धक्का ठाकरे सेनेला बसला आहे. या धक्कादायक घडामोडीनंतर संतप्त झालेल्या ठाकरे सेनेने बाळ माने यांची पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत तातडीने पक्षातून हकालपट्टी केली आहे.

Advertisement

बाळ मानेंच्या ठाकरेसेनेतून झालेल्या हकालपट्टीनंतर त्यांच्या आता पुढील राजकीय वाटचालीकडे लक्ष लागले आहे. मात्र, भाजपने गुप्तता पाळून ज्या पद्धतीने अंतिम क्षणी त्यांना निवडणुकीतून माघार घ्यायला लावली, त्यावरून त्यांच्यासाठी भाजपचे दरवाजे खुले होऊन घरवापसी होईल, अशी शक्यता दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बाळ माने यांच्याबद्दल सकारात्मकता दर्शवून ते पूर्वीचे भाजपचेच सहकारी होते, असे म्हटले आहे. त्यामुळे त्यांची भाजपमध्ये घरवापसी झाल्यास रत्नागिरी जिल्ह्यात भाजपची ताकद वाढण्यास मदत होईल. भाजपनेही हीच रणनीती आखून शिंदेसेनेच्या कोकणातील वाढत्या ताकदीला कमजोर करून भाजपचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी रत्नागिरी भाजपच्या नेत्यांना अधिक पाठबळ दिले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कोकणच्या या जागेवर सुऊवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी आणि आमदारांनी दावा ठोकला होता. कोकणात शिंदे सेनेची ताकद जास्त असल्याने ते वरचढ होण्याचा प्रयत्न करत होते. भाजपने आखलेल्या रणनीतीनुसार नीतेश राणेंनी मात्र थेट विरोधी उमेदवारालाच म्हणजेच बाळ माने यांना माघार घ्यायला लावल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. यामुळे महायुतीतील शिंदेसेनेचा दबाव आणि त्यांची भविष्यातील राजकीय सौदेबाजीची ताकद कमी झाली आहे. भाजपची ही दुसरी राजकीय खेळी आहे.

बाळ माने हे मूळचे भाजपचेच नेते होते आणि त्यांनी 2024 मध्ये ठाकरे गटात प्रवेश केला होता. आता त्यांच्या या माघारीनंतर ते पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करण्याची दाट शक्यता आहे. बाळ माने भाजपमध्ये परतल्यास रत्नागिरी जिल्ह्यात भाजपची ताकद प्रचंड वाढेल. याचा थेट फटका रत्नागिरीचे पालकमंत्री आणि शिंदेसेनेचे वजनदार नेते उदय सामंत यांच्या रत्नागिरीतील एकहाती वर्चस्वाला धक्का बसू शकतो. भाजपची ही तिसरी खेळी आहे. त्यामुळे भाजपने निवडणुकीच्या निमित्ताने एका दगडात तीन पक्षी मारले आहेत.

कोकण विधानपरिषद मतदारसंघातील पक्षीय संख्याबळ पाहता, बाळ माने यांच्या माघारीपूर्वी या मतदारसंघात महायुतीचे पारडे आधीपासूनच जड होते. एकूण 831 मतदारांपैकी शिवसेना शिंदे गट या पक्षाचे 236 मतदार, भारतीय जनता पक्षाचे 151, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट 63, तर उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे 55 व काँग्रेस पक्षाचे 50 मतदार एवढी या पक्षांची ताकद आहे.

भाजपच्या या राजकीय खेळीने कोकणच्या राजकारणावर लाँग टर्म परिणाम होणार आहे. या निवडणुकीने कोकणातील महायुतीमधील अंतर्गत समीकरणे बदलून टाकली आहेत. सिंधुदुर्गचे राणे कुटुंब आणि रायगडचे तटकरे कुटुंब यांच्यातील राजकीय गणिते अधिक घट्ट झाली आहेत. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता, भाजपने कोकणात मित्रपक्षांवर अवलंबून न राहता, स्वत:ची स्वतंत्र ताकद वाढविण्यास सुऊवात केली आहे.

कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र भाजपच्या या अंतर्गत खेळीमुळे शिंदे सेनेला आता अधिक सावध रहावे लागणार आहे. थोडक्यात, सांगायचे तर, नीतेश राणेंनी खेळलेल्या या ‘सिंधुदुर्ग पॅटर्न’ने राजकीय बुद्धिबळाच्या पटावर तूर्तास तरी भाजपला रत्नागिरी आणि संपूर्ण कोकणात किंगमेकरच्या भूमिकेत आणून ठेवले आहे.

संदीप गावडे

Advertisement
Tags :

.