ग्रामपंचायत विजयानंतर आचरेत भाजपचा जल्लोष
आचरा | प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील बहुचर्चीत असलेल्या आचरा ग्रामपंचायतवर पुन्हा एकदा भाजपचा भगवा फडकला आहे. भाजप शिंदेसेनेने साऱ्यांचे अंदाज चुकवित पुन्हा आचरा ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे .विजयी सरपंच उमेदवार जेरोन फर्नांडिस व सदस्य पदाचे उमेदवार आचऱ्यात दाखल होताच त्यांचे जोरदार जल्लोषात स्वागत करण्यात आले. भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली विजय खेचून आणत ठाकरेसेनेला धक्का दिला. या यशात स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते किंगमेकर ठरले. आचरा ग्रामपंचायतीचा निकाल हाती आल्यानंतर भाजपच्या सर्व विजयी उमेदवारांनी रामेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
यावेळी विजयी उमेदवारांसह दत्ता सामंत, नीलिमा सावंत, शिंदेसेना गटाचे तालुकाप्रमुख महेश राणे, दिपक पाटकर, विजय केनवडेकर, धोंडी चिंदरकर, संतोष कोदे, राजन गावकर, डॉ. प्रमोद कोळंबकर, जयप्रकाश परुळेकर, अभिजित सावंत अभय भोसले, प्रफुल घाडी, कपिल गुरव, शेखर मोरवेकर, सचिन हडकर विजय कदम, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
सरपंचपदासह 11 जागांवर भाजप शिंदे सेना युतीचे उमेदवार विजयी
आचरा ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या एकूण 13 जागांपैकी 11 जागा काबीज केल्या. 13 जागांसाठी एकूण 29 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. भाजप शिंदेसेना युतीचे पाच प्रभागातून 11 उमेदवार विजयी झाले. यात प्रभाग १ मधून मुजफ्फर मुजावर, सारिका तांडेल, प्रभाग २ मधून योगेश गावकर, सायली सारंग विजयी झाले. तर प्रभाग ३ मधून चंद्रकांत कदम, व श्रुती सावंत विजयी झाले. प्रभाग 4 मधून महेंद्र घाडी, हर्षदा पुजारे विजयी झालेत. प्रभाग 5 मधून पंकज आचरेकर, संतोष मिराशी, किशोरी आचरेकर यांनी विजय प्राप्त केला.