For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चित्रफीत प्रकरणाची माहिती असूनही भाजपचा निजदशी निवडणूक समझोता

06:58 AM May 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
चित्रफीत प्रकरणाची माहिती असूनही भाजपचा निजदशी निवडणूक समझोता
Advertisement

कुमठ्यात प्रजाध्वनी मेळाव्यात  मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा आरोप 

Advertisement

प्रतिनिधी/ कारवार

हासनचे खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या कथित अश्लील चित्रफीत प्रकरणाची माहिती भाजपला होती. महिलांना रक्षण देण्यात येईल, असा दावा नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते करीत असतात. मात्र या प्रकरणाची माहिती असूनही भाजपने निजदशी निवडणूक समझोता केला, असा आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला. ते शुक्रवारी कुमठा येथील मणकी मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या प्रजाध्वनी मेळाव्यात बोलत होते

Advertisement

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, यावेळी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. निंबाळकर यांना निवडून द्या. यापूर्वी मार्गारेट अल्वा यांनी खासदार या नात्याने मतदारसंघाची सेवा केली आहे. यावेळी मतदारसंघात परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला दहा वर्षांची संधी देण्यात आली. तथापि मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून गरिबांसाठी उजवी कामगिरी झालेली नाही. मोदी आणि भाजपवाले सांगत असतात की केंद्रात आणि राज्यात एक पक्षाचे डबल इंजिन सरकार असले पाहिजे. कर्नाटकात तीन वर्षे दहा महिने भाजपचे सरकार होते आणि त्याचवेळी केंद्रातही भाजपचेच सरकार होते. कर्नाटकची लूट करण्यापलीकडे भाजपने काही केले नाही. ठेकेदार संघटनेच्या अध्यक्षांनी भाजप सरकारवर 40 टक्के कमिशनचा आरोप केला. तथापि या आरोपाबद्दल मोदी यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. दहा वर्षापूर्वी नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केलेली नाही.

कुमठा येथे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा संकल्प

याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले, कारवार जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य आणि काँग्रेसच्या उमेदवार डॉ. निंबाळकर यांनी कारवार जिल्ह्यात मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारणीचा संकल्प केला आहे. काँग्रेस पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यातही रुग्णालयाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे येथे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारणारच असा दावा केला. जिल्हावासियांच्या समस्यांची जाणीव काँग्रेसला आहे. मार्गारेट अल्वानंतर पुन्हा एकदा या मतदारसंघातून महिला उमेदवार तुम्ही निवडून आणणार याची खात्री आम्हाला आहे. दिलेल्या शब्दांची पूर्तता करणे केवळ काँग्रेसला जमते. आम्ही जात, धर्माचे राजकारण करणार नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेचे आयोजन केले आहे. आम्ही प्रजाध्वनी मेळाव्यांचे आयोजन करीत आहोत. काँग्रेसने कुणाची फसवणूक केलेली नाही. आम्ही कोणत्याही गॅरंटी योजनेची अंमलबजावणी जात, धर्माच्या आधारे केलेली नाही. केंद्रात काँग्रेस सरकार आल्यास महालक्ष्मी योजनेची अंमलबजावणी करणार आहोत. महिलांच्या खात्यावर प्रत्येक वर्षी एक लाख रुपये जमा करणार आहोत, असे आश्वासन पुढे शिवकुमार यांनी दिले.

शाबंद्री यांचा काँग्रेस प्रवेश

कुमठा येथील मणकी मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या प्रजाध्वनी मेळाव्याचे औचित्य साधून भटकळ येथील निजदचे नेते इनायत उल्ला शाबंद्री यांनी निजदला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भटकळ येथील मुस्लीम बांधवांची सर्वोच्च संघटना असलेल्या तंजीम संस्थेचे शाबंद्री हे अध्यक्ष आहेत. शाबंद्री यांचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्वागत केले. शाबंद्री यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे भटकळनगरात काँग्रेसला लाभ होणार असे सांगितले जाते. कुमठा येथील प्रजाध्वनी मेळाव्याला माजी खासदार मार्गारेट अल्वा, माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे, जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य, माजी मंत्री रमानाथ रै आदी नेते उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.