For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नाराजी दूर करण्याचे भाजपचे प्रयत्न

11:24 AM Nov 24, 2023 IST | Tarun Bharat Portal
नाराजी दूर करण्याचे भाजपचे प्रयत्न
Advertisement

आमदार रमेश जारकीहोळी यांचे मनपरिवर्तन

Advertisement

बेंगळूर : लोकसभा निवडणुकीसाठी लिंगायत मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपश्रेष्ठींनी माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांना प्रदेशाध्यक्षपदी नेमले आहे. परंतु, विजयेंद्र यांच्या निवडीमुळे राज्य भाजपमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. नाराजी दूर करण्यासाठी पक्षश्रेष्ठींसह खुद्द विजयेंद्र यांनीच पुढाकार घेतला आहे. त्यांनी गुरुवारी आमदार रमेश जारकीहोळी यांची भेट घेऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. रमेश जारकीहोळींची समजूत काढण्यात ते यशस्वीही ठरले.

भाजप प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा विरोधी पक्षनेता निवडीविषयी माजी मंत्री आणि विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्याप्रमाणे माजी मंत्री व्ही. सोमण्णा, बसनगौडा पाटील-यत्नाळ हे देखील नाराज आहेत. लोकसभा निवडणूक जवळ आलेली असताना पक्षातील नाराजी उफाळून येऊ नये यासाठी वरिष्ठ सतर्क झाले आहेत. विजयेंद्र यांना प्रदेशाध्यक्षपदी नेमण्यात आल्यानंतर यत्नाळ आणि व्ही. सोमण्णा यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. त्यामुळे विजयेंद्र हे स्वत: या नेत्यांची भेट घेत आहेत. गुरुवारी त्यांनी बेंगळूरच्या सदाशिवनगर येथील निवासस्थानी रमेश जारकीहोळी यांची भेट घेतली.

Advertisement

भेटीप्रसंगी उभय नेत्यांमध्ये अर्धातास चर्चा झाली. पक्षातील अलिकडील घडामोडी आणि लोसकभा निवडणुकीत पक्षाला अधिक जागा मिळवून देण्याच्या रणनीतीविषयी चर्चा केल्याचे समजते. विरोधी पक्षनेता किंवा प्रदेशाध्यपदाची निवड करताना उत्तर कर्नाटकाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी रमेश जारकीहोळी यांनी केली होती. मात्र, ही दोन्ही पदे दक्षिण कर्नाटकाला देण्यात आल्याने ते नाराज आहेत. त्यामुळे विजयेंद्र यांनी त्यांचीही भेट घेत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यशही आले आहे. याप्रसंगी रमेश यांनी विजयेंद्र यांना सहकार्याचे आश्वासन दिले. आता विजयेंद्र यांच्यासमोर यत्नाळ, सोमण्णा यांच्यासह इतर नेत्यांची समजूत काढण्याचे आव्हान आहे.

सर्वांना विश्वासात घेणार : विजयेंद्र

रमेश जारकीहोळींची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना बी. वाय. विजयेंद्र म्हणाले, ज्येष्ठांनी कोणतीही विधाने केली तरी त्याची गंभीरपणे दखल घेईल. त्यांना विश्वासात घेऊनच पुढील वाटचाल करेन. विधानांचा चुकीचा अर्थ न घेता प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहे. नेत्यांनी भिन्न स्वरुपात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, त्यात गैर नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात 28 पैकी 28 जागा जिंकून नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनविण्याचे उद्दिष्ट आहे. हायकमांडने दिलेली जबाबदारी निष्ठेने सांभाळेन. पक्षातील किरकोळ मतभेद दूर करून सर्वांना विश्वासात घेईन, असा पुनरुच्चार विजयेंद्र यांनी केला.

Advertisement
Tags :

.