भाजपचा दक्षिणेतील पराभव अटळ
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचा दावा
प्रतिनिधी/ पणजी
भाजपच्या दोन ज्येष्ठ नेत्यांनी निवडणूक लढविण्यास दर्शविलेली अनास्था म्हणजेच दक्षिणेतील त्यांचा पराभव अटळ असल्याचे सिद्ध होत आहे, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे.
शनिवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, केपेचे आमदार अॅल्टन डिकॉस्ता आणि खासदार फ्रान्सिस सार्दिन यांची उपस्थिती होती. सभापती रमेश तवडकर आणि आमदार दिगंबर कामत या दोन ज्येष्ठ नेत्यांनी ज्या प्रकारे निवडणूक लढण्यास अनास्था दर्शविली आहे त्यातून या जुमला पक्षाच्या दक्षिणेतील पराभवावर शिक्कामोर्तब झाले आहे, असा दावा पाटकर यांनी केला.
काँग्रेसचा उमेदवार यापूर्वीच निश्चित झाला आहे, लवकरच त्यांच्या नावाची घोषणा करण्यात येईल. याउलट गेल्या पाच वर्षांत भाजप चांगला उमेदवार तयार करू शकला नाही, त्यामुळे त्यांच्यात प्रचंड गोंधळ आहे, असे पाटकर म्हणाले.
भाजपने प्रत्येकवेळी फूट पाडून राज्य करण्याचा प्रयत्न केला आहे, एवढेच नव्हे तर ‘वापरा आणि फेका’ या धोरणांतर्गत ‘डिफेक्टर्स’चा वापर करून त्यांचीही राजकीय कारकीर्द कशी संपविली हे जनतेला पूर्ण माहीत आहे, असेही पाटकर यांनी पुढे सांगितले.
सत्ता मिळाल्यास 30 लाख नोकऱ्या
दरम्यान, देशात बेराजगारीचा प्रश्न जटील बनत चालला आहे. सरकारच्या विविध खात्यांमध्ये लाखो पदे रिक्त आहेत. परंतु दहा वर्षांचा कार्यकाळ मिळूनही सदर पदे भरण्यासाठी विद्यमान भाजप सरकारने काहीच प्रयत्न केले नाही. अशावेळी काँग्रेस सत्तेत आल्यास सदर रिक्त पदे भरण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे राहुल गांधी यांनी सांगितल्याची माहिती पाटकर यांनी दिली.
भारत जोडो न्याय यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात राहुल गांधी यांनी आदिवासीबहुल राजस्थानमधील बांसवाडा भागास भेट दिली. त्यावेळी तऊणांना संबोधित करताना ते बोलत होते. तेथे त्यांनी 30 लाख कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिल्याचे पाटकर यांनी सांगितले.