For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपचे ‘संविधान गौरव अभियान’

12:54 PM Jan 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
भाजपचे ‘संविधान गौरव अभियान’
Advertisement

राज्यभर चालणार 25 जानेवारीपर्यंत : भाजप नेते बाबू कवळेकर यांची माहिती

Advertisement

पणजी : भारतीय जनता पक्ष हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. तरीही विरोधक भाजपवर जातीयवादीचा आरोप करीत आलेले आहेत. संविधान रक्षणाचे कार्य हे भाजप पक्षाकडून चालविण्यात येत असून 11 जानेवारीला सुरू करण्यात आलेले ‘संविधान गौरव अभियान’ राज्यातील सर्व 40 मतदारसंघात 25 जानेवारीपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती माजी उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते बाबू कवळेकर यांनी दिली. भाजपच्या कार्यालयात काल सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी वास्कोचे आमदार दाजी साळकर, पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, भाजप प्रवक्ता यतीश नाईक, गिरीराज पै वेर्णेकर उपस्थित होते. बाबू कवळेकर यांनी सांगितले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाद्वारे सर्व भारतीयांना अधिकार मिळवून दिले आहेत. ह्या संविधानाच्या रक्षणार्थ आम्ही हे ‘संविधान गौरव अभियान’ राज्यभर राबवत आहोत. दक्षिण व उत्तर या दोन्ही जिह्यात संविधान रक्षणार्थ सभा होणार आहेत. डॉ. आंबेडकर यांनी निर्मिलेल्या संविधानाला यंदा 75 वर्षे पूर्ण होणार असल्याने या अभियानाचे आयोजन भाजपने संपूर्ण राज्यभर केले असल्याचेही ते म्हणाले.

Advertisement

संविधानाद्वारे भाजपने घडविली क्रांति 

अॅङ यतीश नाईक म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्माण करताना देशाच्या हितासाठी जे जे निर्णय घेण्याचे अधिकार दिले, त्या अधिकारातूनच भाजपने आतापर्यंत बदल केले. त्यातील महत्त्वपूर्ण बदल म्हणजे 370 कलम हटवून देशात क्रांती घडवली. महिलांना त्यांचे अधिकार प्राप्त करून दिले. त्यामुळे विरोधी काँग्रेसने केवळ संविधान हातात दाखविण्याऐवजी त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे, असेही नाईक म्हणाले.

काँग्रेसने आंबेडकरांचा अनादर केला

गिरीराज पै वेर्णेकर यांनी संविधान रक्षणाचे खरे काम भाजपनेच केल्याचे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्मितीसाठी जे कष्ट घेतले, देशातील  जनतेला जे अधिकार मिळवून दिले ते विसरता येत नाही. तरीही काँग्रेसने वारंवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अनादर केला. डॉ. आंबेडकर यांना जीवंत असताना भारतरत्न पुरस्कार देण्यात काँग्रेसने तुच्छता मानली आणि  मरणानंतरही कित्येक वर्षांनी त्यांना भारतरत्न हा किताब दिला. त्यावरूनच काँग्रेसची कुटनिती दिसून येते. त्यामुळे भाजपवर संविधान बदलण्याचा आरोप करू नये, असा इशाराही वेर्णेकर यांनी दिला.

Advertisement
Tags :

.