For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

छत्तीसगडमध्ये भाजपची सत्तेला गवसणी

05:14 AM Dec 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
छत्तीसगडमध्ये भाजपची सत्तेला गवसणी
Advertisement

काँग्रेसवर धक्कादायक पराभवाची वेळ : मुख्यमंत्री भूपेश बघेल थोडक्यात बचावले

Advertisement

छत्तीसगडमध्ये काँग्रेसला पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. छत्तीसगड निवडणुकीत सर्वांचे अंदाज फोल ठरवत भाजपने स्वबळावर बहुमत मिळविले. भाजपच्या या कामगिरीने सर्वांनाच चकीत केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनाच निसटत्या मतानी विजय मिळविता आला आहे. तर उपमुख्यमंत्री टी. एस. सिंहदेव हे केवळ 122 मतांनी पराभूत झाले आहेत. याचबरोबर राज्याच्या अनेक मंत्र्यांना पराभव पत्करावा लागला.

राज्याचे खाद्य मंत्री अमरजीत भगत हे पराभूत झाले आहेत. तर राज्याच निकाल पाहता काँग्रेस नेते धनेंद्र साहू यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे.  भाजपला 54 जागांवर यश मिळाले असून बहुमतासाठीचा 46 चा आकडा स्वबळावरच ओलांडलाय. सत्ता गमवावी लागल्यामुळे छत्तीसगड काँग्रेसमध्ये निराशा पसरली. माजी मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह यांनी राजनांदगाव मतदारसंघात विजय मिळवत मुख्यमंत्रिपदावरचा स्वत:चा दावा सिद्ध केला आहे. रमणसिंह यांना यावेळी अन्य भाजप नेत्यांसोबतच्या स्पर्धेला तोंड द्यावे लागणार आहे. अखेर पक्षनेतृत्व म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांचा निर्णय अंतिम ठरणार आहे.

Advertisement

उपमुख्यमंत्री व काँग्रेस नेते टी. एस. सिंहदेव, मंत्री ताम्रध्वज साहू, मोहम्मद अकबर, अमरजीत भगत, रवींद्र चौबे, जयसिंह अगरवाल, रुद्रकुमार हे पराभूत झाले आहेत. विधानसभा अध्यक्ष चरणदास महंत यांनाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. तर सांप्रदायिक तणावामुळे चर्चेत आलेला कवर्धा मतदारसंघात काँग्रेसचे मोहम्मद अकबर पराभूत झाले आहेत. सांप्रदायिक तणावाचा काँग्रेसला मोठा फटका बसल्याचे निकालात दिसून आले आहे.

3 ऑक्टोबर 2021 रोजी धार्मिक ध्वज लावण्यावरून निर्माण झालेला वाद सांप्रदायिक तणावात बदलला होता. दोन गटांच्या मारहाणीनंतर शहरात 144 कलम लागू करण्यात आले होते. भाजप नेते विजय शर्मा यांना अटक करण्यात आली होती. विजय शर्मा यांनाच भाजपने उमेदवारी दिली होती. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसने मोहम्मद अकबर यांना उभे केल्याने निवडणुकीत ध्रुवीकरणाचे चित्र दिसून आले होते. याचा लाभ भाजपला झाल्याचे स्पष्ट झाले.

बघेल यांच्यावर ‘महादेव’चा कोप

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत ‘राम’ आणि ‘महादेव’ हे शब्द वारंवार वापरले गेले. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी भाजपच्या हिंदुत्वाच्या कार्डला प्रत्युत्तर म्हणून जुने सॉफ्ट हिंदुत्वाचे धोरण स्वीकारले.  प्रारंभी काँग्रेस प्रचारात पूर्णपणे प्रभावी होता, परंतु ऐन प्रचारात भूपेश बघेल यांच्यावर ‘महादेव’चा कोप झाला. भूपेश बघेल हे हिंदुत्वाच्या रथावर स्वार होत प्रचारात आघाडी मिळवून होते. याचकाळात छत्तीसगडच्या राजकारणात मोठा विस्फोट झाला. नोव्हेंबर महिन्यात ईडीने महादेव बेटिंग अॅप घोटाळ्याचा खुलासा केला. महादेव अॅपच्या प्रवर्तकांनी भूपेश बघेल यांना 508 कोटी रुपयांची लाच दिली होती असा दावा ईडीने केला होता. तसेच ईडीने रायपूर येथील एका हॉटेलमधून 5.39 कोटी रुपये जप्त केले होते. ही रक्कम काँग्रेसच्या प्रचार खर्चासाठी वापरली जाणार होती असेही सांगण्यात आले. काँग्रेसन भगवान शिव यांचे नाव महादेवलाही सोडले नसल्याची टीका पंतप्रधान मोदींनी केली होती. महादेव अॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकार आणि रवि उप्पल यांनी अवैध सट्टेबाजीचे संचालन करत हजारो कोटी रुपये कमाविल्याचा आरोप आहे.

Advertisement
Tags :

.