‘आप’ विरोधात भाजपचे ‘आरोपपत्र’
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
हरियाणा, जम्मू-काश्मीर, झारखंड आणि महाराष्ट्र या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या नंतर आता दिल्ली विधानसभा निवडणुकीकडे राजकीय पक्षांचे लक्ष वेधले गेल आहे. दिल्लीत आम आदमी पक्षाचे सत्ता सलग दोन वेळा राहिली असून तो पक्ष तिसऱ्या वेळेसाठी तयारी करीत आहे. दिल्लीत यावेळी तिरंगी लढत होण्याची शक्यता असून भारतीय जनता पक्ष, आम आदमी पक्ष आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष सर्व जागांवर उमेदवार देतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रमुख लढत भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्ष यांच्यात होईल. दोन्ही पक्षांनी आतापासूनच तयारी सुरु केली असून आम आदमी पक्षाने आपल्या काही उमेदवारांचीही घोषणा केली आहे. भारतीय जनता पक्षाने सोमवारी आम आदमी पक्षाच्या 10 वर्षांच्या सत्ताकाळातील प्रकरणांच्या संदर्भात आरोपपत्र प्रसिद्ध केले. भ्रष्टाचार आणि आश्वासनांची पूर्तता न करणे या संबंधांमध्ये हे आरोपपत्र आहे.
आरोप कोणते आहेत...
आम आदमी पक्षाने दिल्ली भ्रष्टाचारमुक्त करु असे आश्वासन दिले होते. मात्र या पक्षाच्या सत्ताकाळात दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांसह आणि काही मंत्र्यांसह 15 आमदारांना भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये कारागृहात जावे लागले असून त्यांच्यावरील प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. मुख्यमंत्री केजरीवाल हे स्वत:ला क्रमांक 1 चे कार्यक्षम मुख्यमंत्री मानतात. तथापि, त्यांच्या कार्यकाळात दिल्ली प्रदूषणाचे केंद्र बनली आहे. प्रशासकीय कुव्यवस्थापन हे देखील केजरीवाल यांच्या कार्याचे वैशिष्ट्या आहे. दिलेल्या आश्वासनांपैकी निम्मीही पूर्ण झालेली नाहीत, असा आरोप आहे. अमेरिकेतील शीख फॉर जस्टीस या दहतशवादी संघटनेकडून आम आदमी पक्षाने 16 लाख डॉलर्सची देणगी घेतली आहे. या संघटनेचा म्होरक्या गुरुपतवंतसिंग पन्नू याने हा गौप्यस्फोट केला असून आम आदमी पक्षाने अद्याप यावर प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. यावरुन या प्रकरणात काहीतरी शिजत आहे, असाही आरोप भारतीय जनता पक्षाने आम आदमी पक्षावर केला आहे.