For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपचा अश्वमेध

06:43 AM Jan 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
भाजपचा अश्वमेध
Advertisement

मुंबईसह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपने मिळवलेले यश म्हणजे ‘गल्ली ते दिल्ली’पर्यंतच्या भाजपाच्या वर्चस्वाची नांदीच म्हणावी लागेल. लोकसभा, विधानसभा, नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतही भाजपाने ‘न भूतो न भविष्यती’ अशी कामगिरी केल्याचे पहायला मिळाले. हे पाहता भाजपचा अश्वमेध रोखणे आता शक्य नाही, हाच या निवडणुकीचा मथितार्थ ठरावा. यातील मुंबई महानगरपालिकेचा रणसंग्राम हा सर्वांच्याच औत्सुक्याचा केंद्रबिंदू. मागच्या 25 वर्षांपासून मुंबईवर शिवसेनेचा सत्तासूर्य तळपत होता. ही सत्ता घालवायचीच, असा पण केलेल्या भाजपाने साम, दाम, दंड, भेद अशी सर्व आयुधे वापरत अखेर ठाकरे बंधूंना धक्का दिल्याचे दिसून येते.  जवळपास 80 वर जागांवर आघाडी घेऊन भाजपाने पुढचे पाऊल टाकले असले, तरी या निवडणुकीत 91 जागा लढवणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या सेनेला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे अन्य कुणाची मदत घ्यावी लागेल का, हे पहावे लागेल. दुसऱ्या बाजूला 130 जागा लढवणाऱ्या ठाकरेसेनेला 60 ते 65 जागांवर समाधान मानावे लागलेले दिसते. मागच्या निवडणुकीपेक्षा ठाकरेसेनेला 20 ते 25 जागा कमी मिळाल्या असल्या, तरी मुंबईवर अजूनही उद्धव ठाकरे यांचा प्रभाव असल्याचे यातून अधोरेखित होते. तथापि, 51 जागा लढवल्यानंतरही मनसेची धाव नऊपर्यंतच सीमित कशी राहते, याचे आत्मचिंतन करायला हवे. उलटपक्षी काँग्रेस स्वतंत्र लढून कोणत्याही अपेक्षा नसताना विसेक जागा जिंकते, हे विचार करायला लावणारे ठरते. मुंबईत तसाही मराठी टक्का कमीच झाला आहे. त्यात गुजराती, मारवाडी व इतर परप्रांतीयांची व्होट बँकही भाजपच्याच ताब्यात आहे. त्यांचा तसेच उच्चभ्रू सोसायट्यांमधील मराठी मतांचा भाजपच्या विजयात मोलाचा वाटा दिसतो. या विजयाने भाजपच मोठा भाऊ असल्यावरही शिक्कामोर्तब झाले असून, मुंबईवर आता त्यांचीच एकाधिकारशाही असेल. मुख्य म्हणजे सेनेचा गड कोसळल्याचे दूरगामी परिणाम राज्याच्या राजकारणावरही होऊ शकतात. खरेतर यातून ठाकरेंच्याच अस्तित्वाचा प्रश्न अधिक ठळक होईलच. शिवाय शिंदेंकरिताही ही धोक्याची घंटा आहे. याशिवाय मुंबई पट्ट्यातील मीरा भाईंदर, नवी मुंबई, पनवेल महानगरपालिकेतील यशही शतप्रतिशतच ठरते. तर ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिकांमध्ये आपल्याशिवाय पर्याय नाही, हे शिंदे यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. त्यामुळे शिंदे यांचे येथील महत्त्व अबाधित राहू शकेल. नागपूर ही राज्याची उपराजधानी. भाजपचा हा बालेकिल्ला कायम ठेवतानाच फडणवीस यांनी 29 पैकी 20 ते 22 महापालिकांवर निर्विवाद वर्चस्व मिळवत आपल्या नेतृत्वाचा खुंटा आणखी बळकट केला, असेच म्हणावे लागेल. पुणे आणि पिंपरी-चिंचवडची निवडणूकही यंदा चांगलीच गाजली. पुण्यात अजित पवार विरुद्ध मुरलीधर मोहोळ, तर पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार विरुद्ध आमदार महेश लांडगे यांच्यात राजकीय कुस्तीचा सामना रंगला. परंतु, यात हे दोन्ही मल्ल सरस ठरल्याचे पहायला मिळते. वास्तविक पक्षाच्या हमीपत्रातून ‘लाडक्या बहिणी’च्या धर्तीवर अजित पवार यांनी मोफत मेट्रो व बससेवेचे गाजर दाखवून मतदारांना भुलवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. तथापि, प्रत्येकवेळी रेवडीचे फंडे यशस्वी होत नाहीत, हे त्यांनी लक्षात घ्यावे. मुंबई पट्ट्यासह उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आदी ठिकाणी भाजपाने यश मिळविले असले, तरी चंद्रपूर, लातूर येथील पराभव भाजपासाठी धक्कादायक ठरतो. चंद्रपूरमध्ये देवेंद्र फडणवीस व सुधीर मुनगंटीवार यांच्यातील वादाचा पक्षाला फटका बसला, हे नक्की. मागच्या काही दिवसांपासून मुनगंटीवार यांना सातत्याने डावलले जात आहे. त्याचाच हा परिणाम. आता तरी वरिष्ठांनी त्यातून बोध घ्यावा. लातूरमध्ये आक्रमक प्रचार प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना भोवला, असे म्हणता येईल. विलासरावांच्या आठवणी पुसल्या पाहिजेत, हे त्यांचे वक्तव्य येथील मतदारांना रुचले नाही. हा लातूरच्या निकालाचा अन्वयार्थ काढता येईल. अर्थात चंद्रपूर व लातूरच्या विजयाचे श्रेय विजय वडेट्टीवार व देशमुख कुटुंबीयांनाही द्यावे लागेल. अडचणीच्या काळातही त्यांनी ज्या संयमाने परिस्थिती हाताळली, त्याचाच हा परिपाक होय. भिवंडी, कोल्हापूरमधील काँग्रेसची कामगिरीही आश्वासक. कोल्हापूरमध्ये बंटी पाटील यांची पकड कायम असली, तरी भाजप व शिंदेसेनेची कामगिरीही उजवी ठरते. औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या इचलकरंजीतील भाजपचे यशही उल्लेखनीय. याखेरीज सोलापूर, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड यांसारख्या महापालिकांमध्ये ज्या पद्धतेने कमळ फुलले, तेही या पक्षाची घोडदौड कशी चौफर स्वरुपाची आहे, हेच सांगणारे म्हणता येईल. जगात जर्मनी, भारतात परभणी, असा उल्लेख केल्या जाणाऱ्या परभणीत ठाकरेसेनेने मारलेली मुसंडी पक्षासाठी सुखद धक्का ठरावी. पक्षफुटीनंतर लोकसभेतील यश वगळता ठाकरेसेनेच्या वाट्याला आनंदाचे क्षण फार कमी आले. त्यात मुंबईही हातची गेली. अशा कठीण समयात पक्षाचा गड मानल्या जाणाऱ्या परभणीमध्ये विजयाचा झेंडा फडकतो, ही सकारात्मक बाजूच ठरते. एकूणच सर्व महापालिकांचा आढावा घेतला, तर भाजप नंबर वन ठरतो. शिंदेसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी यांचीही कामगिरीही चांगली असली, तरी कुणीही भाजपच्या जवळपासही नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. फारसा प्रचार वा प्रयत्न न करताही काँग्रेसने अनेक ठिकाणी मिळवलेले यश मात्र आश्चर्यकारक. त्यामुळे अजूनही काँग्रेसला वाव आहे, असे म्हणता येते. ठाकरे सेनेने मुंबई, परभणीसह काही महापालिकांमध्ये चांगली कामगिरी केली असली, तरी अनेक भागांत त्यांचे अस्तित्वच जाणवले नाही. मनसेचीही तीच अवस्था. राजकारणात टिकायचे असेल, तर यापुढे मुंबईबाहेरही ठाकरेंना लक्ष द्यावे लागले. राष्ट्रवादी शरद पवार गटाची अवस्था पाहता या पक्षाच्याच भवितव्याचाच प्रश्न निर्माण होतो. एमआयएमने छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण राज्यात केलेली कामगिरीही लक्षवेधक. भाजपचा हा झंझावात बघता आता लोकांमध्ये जाऊन संघर्ष करण्याशिवाय विरोधी पक्षाला पर्याय नसेल.

Advertisement

Advertisement
Tags :

.