For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तेलंगणात भाजपचे 4 ही टायर केले पंक्चर

05:05 AM Nov 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
तेलंगणात भाजपचे 4 ही टायर केले पंक्चर
Advertisement

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे वक्तव्य : आता केंद्रातील मोदी सरकार लक्ष्य

Advertisement

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तेलंगणातील जाहीरसभांना संबोधित करताना राज्यात सत्तारुढ असलेल्या बीआरएसला भ्रष्ट ठरविले आहे. तसेच त्यांनी तेलंगणात काँग्रेसच्या 6 गॅरंटी असल्याचे सांगत पक्ष सत्तेवर येताच पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्या सर्व लागू करण्यात येणार असल्याचा दावा केला आहे. राहुल यांनी तेलंगणाच्या निजामाबाद, आदिलाबाद आणि वेमुलावाडा येथे प्रचारसभेला संबोधित केले आहे.

तेलंगणात काँग्रेस पक्ष मोठ्या बहुमतासह सरकार स्थापन करणार  

Advertisement

तेलंगणा निवडणुकीत दोराला आणि प्रजाला सरकारदरम्यान लढाई आहे. जनतेने तेलंगणाचे स्वप्न पाहिले होते आणि जनतेचे सरकार येईल असा विचार केला होता. परंतु मुख्यमंत्री केसीआर यांनी एका कुटुंबाचे सरकार आणले. कालेश्वरम प्रकल्पात केसीआर यांनी एक लाख कोटी रुपयांची चोरी केली आहे. एससी सब प्लॅनद्वारे रक्कम वळविण्यात आली. केसीआर आणि बीआरएस आमदारांनी धरणी पोर्टलच्या निमित्ताने तेलंगणाच्या जनतेची जमीन हिरावून घेण्याचे काम केले तसेच 20 लाख लोकांना नुकसान पोहोचविण्यात आले. केसीआर सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास ते जमीन हिसकावून घेण्याचे काम सुरू करतील अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

तेलंगणात सर्वाधिक पैसा मिळवून देणारे विभाग जमीन, अबकारी आणि वाळू हे केसीआर परिवाराच्या हातात आहेत. केसीआर भ्रष्ट नसते तर ही तिन्ही मंत्रालये त्यांच्या परिवाराच्या हातात नसती. दलित बंधू योजनेत बीआरएसचे आमदार तीन लाख रुपयांचे कमिशन मिळवत असल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे.

केसीआर यांना प्रत्युत्तर

केसीआर हे काँग्रेस पक्षाने काय केले अशी विचारणा करतात. परंतु ज्या शाळा आणि महाविद्यालयात केसीआर शिकले आहेत ते काँग्रेसनेच स्थापन केले होते. काँग्रेसने हैदराबादला आयटी सिटीचा दर्जा मिळवून दिला. काँग्रेसने विमानतळ, मेट्रो आणि रस्ते निर्माण केले, तेलंगणाला काँग्रेसने जनतेच्या मदतीने निर्माण केले होते असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

बीआरएस, भाजप, एमआयएम एकच

‘मोदी जी के हैं दो यार, ओवैसी और केसीआर’ असे म्हणत राहुल यांनी बीआरएस, भाजप आणि एआयएमआयएम एकच असल्याचा दावा केला आहे. लोकसभेत पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यावर बीआरएस खासदार त्यांची मदत करतात. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान रहावेत अशी केसीआर यांची इच्छा आहे. तर केसीआर हे तेलंगणाचे मुख्यमंत्री रहावेत अशी पंतप्रधान मोदींची इच्छा आहे. भाजपविरोधात मी लढत असल्याने माझ्याविरोधात 24 खटले सुरू आहेत. माझे लोकसभा सदस्यत्वही रद्द करण्यात आले होते. माझे निवासस्थान काढून घेण्यात आले. परंतु केसीआर यांच्यावर कुठलाही खटला नाही. तसेच सीबीआय, ईडी आणि प्राप्तिकर विभागानेही त्यांच्यावर कुठलीच कारवाई केलेली नाही. काँग्रेसचे लक्ष्य प्रथम तेलंगणात बीआरएसला पराभूत करणे आहे. त्यानंतर केंद्रात मोदी सरकारला हरविण्याचे आहे. काँग्रेसने तेलंगणात भाजपच्या चारही टायर्सना पंक्चर केले आहे. आता काँग्रेस केंद्रातील मोदी सरकारच्या चारही टायर्सना पंक्चर करणार असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.