भाजप कार्यकर्त्याची छत्तीसगडमध्ये हत्या
वृत्तसंस्था / रायपूर
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यकर्त्याची हत्या केली आहे. गेल्या एक आठवड्यात सवसामान्य नागरीकाच्या हत्येचे हे पाचवे प्रकरण समोर आले आहे. राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने नक्षलवाद्यांविरोधात धडाकेदार अभियान चालविले असून अनेक नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. त्याचा सूड नक्षलवादी सर्वसामान्य नागरिकांवर उगवत आहेत, असे दिसून येत आहे, अशी माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे.
हत्या झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचे नाव कुदियाम मादो असे असून तो वनवासी जमातीचा असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तो सोमनपल्ली गावातील आपल्या घरात असताना मंगळवारी रात्री उशिरा त्याच्या घरात घुसून नक्षलवाद्यांनी हल्ला केला. त्याला घराबाहेर ओढून काढून त्याच्यावर तलवारीचे घाव घालण्यात आले. तो बेसावध असल्याने प्रतिकार करु शकला नाही, असे तक्रारीत स्पष्ट केले गेले. हत्या झालेल्या स्थानी नक्षलवाद्यांचे एक पत्रक सापडले असून हत्या केलेल्यांना पडकण्यासाठी अभियान हाती घेण्यात आले आहे.
पाच जणांची हत्या
गेल्या सात दिवसांमध्ये नक्षलवाद्यांकडून नागरिकांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. 4 डिसेंबरला दोन माजी सरपंचांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्यापैकी एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता होता. 6 डिसेंबरला एका अंगणवाडी साहाय्यिकेची हत्या करण्यात आली. 7 डिसेंबरला आणखी एका महिलेची हत्या करण्यात आली. या भागात जानेवारी 2023 पासून एप्रिल 2024 पर्यंत नक्षलवाद्यांकडून भारतीय जनता पक्षाच्या 9 नेत्यांची हत्या करण्यात आली आहे. बस्तर भागात गेल्या एक वर्षात एकंदर 60 जणांची हत्या झाली आहे.