भाजप कार्यकर्त्याची प. बंगालमध्ये हत्या
बीरभूम येथील घटनेने खळबळ
वृत्तसंस्था/ बीरभूम
पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्याच्या त्रिशुलापट्टी भागात भाजपच्या एका बूथस्तरीय कार्यकर्त्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. 46 वर्षीय चंदन भल्ला यांची हत्या करण्यात आली आहे.
चंदन भल्ला यांना एका इसमाचा फोन आला होता, त्याच्यासोबत फोनवरून बोलणे झाल्यावर भल्ला हे त्वरित घरातून बाहेर पडले होते, ज्याच्या काही वेळानंतरच त्यांची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याचे समोर आले होते. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून घेतला आणि मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी आसपासच्या भागांमध्ये छापे टाकले जात असल्याचे बीरभूमचे पोलीस अधीक्षक विदित राज भुंदेश यांनी सांगितले आहे.
चंदन भल्ला पक्षाचे जुने आणि अत्यंत सक्रिय कार्यकर्ते होते. आमच्या पक्ष कार्यकर्त्याची गोळी झाडून हत्या होणे अत्यंत दुर्दैवी आहे. 24 तासांच्या आत गुन्हेगारांना अटक करत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही प्रशासनाकडे करत आहोत, असे बोलपूर जिल्हा भाजप अध्यक्ष श्यामापद मंडल यांनी म्हटले आहे.