Solapur News : सोलापुरात उमेदवार देण्यात अन् जाहीरनामा प्रसिध्द करण्यात भाजपची बाजी
सोलापुरात राजकीय पक्षासह अपक्ष उमेदवारांनी प्रचारास सुरुवात
सोलापूर : महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षासह अपक्ष उमेदवारांनी प्रचारास सुरुवात केली आहे. भाजपने सोलापूर महापालिकेच्या सर्व १०२ जागाबर भाजप उमेदवार निवडणुकीत उभे करुन बिरोधकांना आव्हान दिले. त्याचबरोबर शहराच्या पुढील पाच वर्षाच्या विकासाचा जाहीरनामाही भाजपने प्रसिध्द करत यातही पहिली बाजी मारली. अन्य पक्षाकडून अजूनही जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला नाही.
भाजपने सोलापूर शहराला दररोज पाणीपुरवठा, आयटी पार्क यासह सुंदर व स्वच्छ सोलापूर बनविण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले आहेत. विमानसेवा सुरु केली भविष्यात तिरुपतीसह अन्य शहरासाठी विमानसेवा सुरु करण्याचे आश्वासन भाजपने सोलापूरकरांना दिले आहेत. महाविकास आघाडीने सोमवारी प्रचाराचा नारळ फोडला. मात्र जाहीरनामा प्रसिध्द केला नाही. केवळ भाषणबाजीच यावेळी झाली. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेमके व्हिजन तरी काय असा प्रश्न मतदारांतून उपस्थित होत आहे. महाविकास आघाडीत सहभागी असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, माकप, मनसे, ठाकरे सेना या पक्षाकडून स्वतंत्र आश्वासने सोलापूरकरांना देण्यात येत असल्याचेही दिसून येत आहेत.
राज्यात महायुतीत सहभागी असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट व शिंदे शिवसेना यांनी सोलापूर महापालिकेसाठी भाजपविरुध्द युती करत निवडणुका लढवित आहेत. सत्तेत समसमान बाटा असल्याची बाटाघाटी झाल्यानंतरही उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे, जाहीरनामा प्रसिध्द करणे यात हे दोन्ही पक्ष मागे पडले आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षाकडून जाहीरनाम्यात कोणती आश्वासने मिळणार याचीही उत्सुकता सोलापूरकरांना लागली आहे.
काँग्रेसकडूनही जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला नाही. मागील निवडणुकीत भाजपने जाहीर केलेला जाहीरनामाच वाचून त्यातील त्रुटी काढण्याचे काम काँग्रेसकडून होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र सत्ता आली तर त्यांच्याकडून काय प्राधान्याने होणार याचे ठोस आश्वासने त्यांच्याकडून देण्यात येत नसल्याने मतदारांतूनही आश्चर्य व्यक्त होत आहे.