जम्मू-काश्मीरात होईल भाजपचा विजय !
पक्षाचे नेते राम माधव यांचे प्रतिपादन, जोरदार सज्जता करुन प्रचार करणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जम्मू-काश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विजयी होणार असून हाच पक्ष सरकार स्थापन करेल, असा विश्वास या पक्षाचे जम्मू-काश्मीर निवडणूक प्रभारी राम माधय यांनी व्यक्त केला आहे. या निवडणुकीसाठी पक्षाने जोरदार प्रचार सिद्धता केली असून केंद्रशासित प्रदेशाच्या कानाकोपऱ्यात पक्ष पोहचविण्याचा निर्धार त्यांनी लाल चौक मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार ऐजाझ हुसेन यांच्या उमेदवारी सादरीकरण कार्यक्रमात केला. याच महिन्यात राज्यात या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी हे पक्ष दहशतवाद आणि फुटीरतावादाला प्रोत्साहन देतात, असा आरोप राम माधव यांनी त्यांच्या वक्तव्यात केला आहे.
केंद्र सरकारने 2019 मध्ये जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा घटनेचा अनुच्छेद 370 निष्प्रभ केला होता. तसेच या राज्याची दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागणी केली होती. या परिवर्तनानंतर तेथे प्रथमच विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे ती प्रदेशाच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची मानली जात आहे. भारतीय जनता पक्ष, नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस आणि पीपल्स डेमॉव्रेटिक पक्ष हे चार महत्वाचे पक्ष या निवडणुकीत भाग घेत असून काही स्थानिक पक्षही रणमैदानात उतरले आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
जम्मू भागात भाजप प्रबळ
जम्मू-काश्मीरचे जम्मू आणि काश्मीर असे दोन विभाग असून जम्मू या हिंदूबहुल भागात भारतीय जनता पक्षाचे पूर्वापार प्राबल्य आहे. काश्मीर खोऱ्याच्या प्रदेशात मुस्लीम बहुसंख्य असल्याने तेथे आजवर भारतीय जनता पक्षाला यश मिळालेले नाही. यावेळच्या निवडणुकीत हा पक्ष जम्मू भागात स्वबळावर संग्राम करीत असून खोऱ्यातील काही मतदारसंघांमध्ये अन्य स्थानिक पक्षांशी त्याने युती केली आहे. परिणामी येथेही यश मिळेल अशी पक्षाला आशा आहे.
विरोधकांची युती
या भागातील प्रमुख पक्ष काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने यावेळी युती करुन निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ही युती जम्मू आणि काश्मीर या दोन्ही भागांमध्ये सर्व जागांवर निवडणूक लढणार आहे. मात्र, पीडीपीला या युतीत स्थान देण्यात आलेले नाही. परिणामी हा पक्ष स्वतंत्ररित्या मैदानात उतरला आहे.
परिसीमनानंतर जागांमध्ये वृद्धी
जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या जागांच्या संख्येत परिसीमनानंतर वाढ झाली असून आता एकंदर 114 जागा आहेत. त्यांच्यापैकी 24 जागा या पाकव्याप्त काश्मीरसाठी आरक्षित आहेत. तर जम्मू आणि काश्मीर मध्ये मिळून 90 जागा आहेत. या 90 जागांपैकी 43 जम्मू विभागात तर 47 काश्मीर खोऱ्यात आहेत. परिसीमनानंतर या दोन्ही विभागांमधील जागांच्या संख्येतील अंतरही कमी झाले आहे. परिणामी, दोन्ही विभागांना सत्तास्थापनेच्या खेळात जवळपास समान महत्व मिळाले आहे. ही बाब या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. प्रदेशातील मतदारांची एकंदर संख्या 88 लाख 6 हजार इतकी आहे.
सध्या विधानसभा अस्तित्वात नाही
सध्या जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा अस्तित्वात नाही. त्यामुळे उपराज्यपालांच्या माध्यमातून या प्रदेशाचा कारभार चालविला जात आहे. विधानसभा निवडणुकीनंतर विधानसभा अस्तित्वात येणार असून नवे सरकारही स्थापन होणार आहे. पूर्वी लडाखचा प्रदेशही जम्मू-काश्मीर राज्याचा भाग होता. मात्र, आता तो वेगळा करण्यात आला असून तोही केंद्रशासित प्रदेश करण्यात आला आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत लडाखचा समावेश नाही. तेथे स्वतंत्ररित्या नंतर निवडणूक होण्याची शक्यता आहे, अशी माहितीही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.