For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दक्षिणेसह दोन्ही जागा भाजपच जिंकणार

12:08 PM Mar 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
दक्षिणेसह दोन्ही जागा भाजपच जिंकणार
Advertisement

महिला उमेदवार असल्या तरी विजय निश्चित : भाजपा अध्यक्ष सदानंद तानावडे यांचा विश्वास

Advertisement

म्हापसा : देशाला विकसित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अत्यंत आवश्यकता आहे. यासाठी लोकसभेच्या दक्षिण गोव्यासह दोन्ही जागांवर भाजपच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे. सर्व विरोधी पक्ष एकत्रित आले तरी आम्हाला फरक जाणवणारही नाही. दक्षिण गोव्यात महिला उमेदवार दिला तरीही दक्षिण गोव्यासह भाजपचे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार आहेत, असा ठाम विश्वास गोवा प्रदेश भाजप अध्यक्ष तथा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी म्हापसा येथे काल मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री तथा लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक, आमदार मायकल लोबो, उपसभापती जोशुआ डिसोझा, माजी आमदार ग्लेन टिकलो, दयानंद सोपटे, उत्तर गोवा अध्यक्ष महानंद अस्नोडकर, आमदार केदार नाईक, नगराध्यक्ष डॉ. नूतन बिचोलकर, दत्ता खोलकर उपस्थित होते. आमदार केदार नाईक यांनी स्वागत केले.

महिला उमेदवार असल्या तरीही विजय

Advertisement

भाजपला कोण विरोध करणार त्यावर आम्ही जात नाही. आम्ही सदैव 50 टक्याहून अधिक मतांनी विजयी झालो आहोत. दक्षिण गोव्यात 33 टक्के आरक्षण केल्याने महिलांचे नाव पुढे केले आहे. महिला उमेदवार असल्या तरी आमचा विजय निश्चित आहे. अंतिम निर्णय केंद्रातच होतो. दक्षिणेत कोणतेही मतभेद नाहीत. दोन्ही जागा भाजपच जिंकणार आहे, असा पुनरुच्चारही तानावडे यांनी केला.

मोदींमुळे देश ताठ मानेने उभा

भाजपचे कार्य घरोघरी पोहोचविण्यासाठी पत्रकारांनी मदत केली आहे. पक्षाची शिस्त आहे ती बाळगून आम्ही पुढे जात असतो. ‘सबका साथ, सबका विकास’ हे भाजपचे घोषवाक्य आहे. भारत विकसित होण्यासाठी मोदी पुढे आले. प्रत्येक नागरिकांचे यासाठी आपल्या परिने सहकार्य लाभत आहे. भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन वेगळा होता. मोदी आल्यापासून या देशाची अनेक स्वप्ने पूर्ण झाली आणि त्याचबरोबर जगातही देश ताठ मानेने उभा राहिला, असे केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले.

विकासासाठी मोदींना साथ द्यावी

मोदीजींच्या प्रयत्नांमुळे हे राष्ट्र आणखी विकसित होणार आहे. आमची अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावर पोचली आहे. आमचे राष्ट्र जगात एक नंबरवर येऊ शकते, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे भाजपची, मोदींजींची साथ देणे महत्त्वाचे आहे. गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारमुळे गोव्यातही मोठ्या प्रमाणात विकास जनतेने पाहिलेला आहे. त्यामुळे जनता मोदींचे सरकार आणखी मजबूत करण्यासाठी गोव्यातील दोन्ही जागांवर भाजपला विजयी करणार आहे, असेही नाईक म्हणाले.

पुढील निवडणुकीत युवा पिढीला उमेदवारी द्यावी

लोकसभेच्या 2029 च्या निवडणुकीत उत्तर गोव्यात युवावर्गाला संधी द्यावी, असे आपण यापूर्वीच पक्षाला सांगितले आहे. आमचा उमेदवार सदैव बिनविरोध ठरावा आणि त्याला मतदारांनी भरघोस मतांनी विजयी करावे, असे आमचे म्हणणे असते. पक्षाने घेतलेला निर्णय सर्वांनी मान्य करुन देशकार्यासाठी जी भूमिका आपल्याला पक्षाने दिली आहे, ती प्रामाणिकपणे, कष्टपूर्वक पार पाडणे, हे आमचे कर्तव्य असते, असेही नाईक म्हणाले.

Advertisement
Tags :

.