भाजप अल्पसंख्यांना आरक्षण देणार नाही
वृत्तसंस्था / पलामू
जोपर्यंत भारतीय जनता पक्ष अस्तित्वात आहे, तोपर्यंत या पक्षाकडून कधीही धार्मिक अल्पसंख्यांकांना आरक्षण दिले जाणार नाही, असे ठाम प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. झारखंड राज्यातील पलामू येथे ते विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित सभेत भाषण करीत होते. आपल्या भाषणात त्यांनी प्रामुख्याने बांगला देशातील मुस्लीमांच्या घुसखोरीचा मुद्दा उपस्थित केला. झारखंडचे राज्य सरकार या घुसखोरीकडे दुर्लक्ष करत आहे. मुस्लीम घुसखोरांमुळे राज्यातील आदीवासी संख्या कमी होत आहे. तसेच आदीवासींच्या जमिनी हे घुसखोर बळकावत असल्याचा आरोप शहा यांनी केला.
मुस्लीमांना आरक्षण देण्याचा मुद्दा राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता. काँग्रेस आणि मित्र पक्षांना बहुमत मिळाल्यास मुस्लीमांना आरक्षण देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते. त्याला प्रत्युत्तर देताना शहा यांनी काँग्रेस लोकांची फसवणूक करीत असल्याची टीका केली. भारताच्या राज्य घटनेत धार्मिक आधारावर आरक्षण देण्याची तरतूद नाही. त्यामुळे धर्माच्या आधारावर आरक्षण कोणीही देऊ शकत नाहीत. काँग्रेस केवळ मतांसाठी अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करीत आहे. लोकांनी या पक्षाच्या जाळ्यात अडकू नये, असे आवानह त्यांनी केले.
तर मागासांचे आरक्षण जाणार
काँग्रेसने मुस्लीमांसाठी 10 टक्के आरक्षण देले तर अन्य मागासवर्गीय, दलित आणि आदीवासी यांचे आरक्षण कमी होणार आहे. कारण त्यांचे आरक्षण कमी केल्याशिवाय मुस्लीमांना आरक्षण दिले जाऊ शकत नाही. राहुल गांधींच्या मनात कोणतेही कारस्थान असले तरी जोपर्यंत भारतीय जनता पक्ष आहे, तो पर्यंत गांधींचे कारस्थान यशस्वी होऊ दिले जाणार नाही. भारतीय जनता पक्ष अन्य मागासवर्गीय, दलित आणि वनवासी यांच्या आरक्षणाचे संरक्षण करण्यास कटिबद्ध आहे, हे काँग्रेसने लक्षात ठेवावे, असे प्रतिपादन अमित शहा यांनी केले.