For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जम्मू-काश्मीरमध्ये भाजप सरकार स्थापू !

06:07 AM Sep 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
जम्मू काश्मीरमध्ये भाजप सरकार स्थापू
Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्धार, ‘370’ निष्प्रभ केल्याने प्रदेश प्रगतीपथावर आल्याचे प्रतिपादन

Advertisement

वृत्तसंस्था / जम्मू

‘जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचे दोन टप्पे पार पडले असून भारतीय जनता पक्ष विजयपथावर अग्रेसर आहे,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते जम्मूमध्ये एका विराट प्रचारसभेत भाषण करीत होते. तिसऱ्या आणि अंतिम मतदान टप्प्यापूर्वीची ही अंतिम प्रचार सभा होती.

Advertisement

मतदानाच्या प्रथम आणि द्वितीय टप्प्यात मतदारांनी प्रचंड उत्साह दर्शविला आहे. गेल्या अनेक दशकांमध्ये नव्हती, इतकी मतदानाची टक्केवारी यावेळी गाठली गेली आहे. इतिहासात प्रथमच या प्रदेशात जम्मू विभागातील लोकांच्या इच्छेनुसार सरकार स्थापन होणार आहे. यावेळी या प्रदेशात भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापनेची पूर्ण संधी असून जम्मू विभागातील मतदारांनी या संधीचा लाभ उठविला पाहिजे. भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही या विभागाच्या समस्या प्राधान्यक्रमाने सोडवू, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले.

तीन कुटुंबांकडून घात

जम्मू-काश्मीर प्रदेशाचा घात तीन कुटुंबांनी केला आहे. या तीन कुटुंबांची नावे काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमॉव्रेटिक पक्ष अशी आहेत. या प्रदेशात पुन्हा भ्रष्टाचार बहरावा आणि नोकऱ्यांमध्ये पक्षपात व्हावा, अशी या कुटुंबांची इच्छा आहे. काश्मीरच्या जनतेला दहशतवाद, फुटीरतावाद आणि रक्तपात नको आहे. येथील जनतेला शांतता, प्रगती आणि समाधान हवे आहे. येथील जनता आता समृद्ध भविष्यकाळाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळेच येथील जनतेला भारतीय जनता पक्षाचे सरकार हवे आहे, असे स्पष्ट प्रतिपादन त्यांनी भाषणात केले.

सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख

8 वर्षांपूर्वी याच दिवशी, अर्थात दिनांक 28 सप्टेंबरला भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला होता. या सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून भारताने जगाला एक महत्वाचा संदेश दिला. यापुढे भारत दहशतवाद सहन करणार नाही, हा तो संदेश होता. काँग्रेसच्या हाती केंद्र सरकार होते, तेव्हा दहशतवाद्यांना मोकळे रान मिळत होते. पाकिस्तानी दहशतवादी भारतात धुमाकूळ घालत होते आणि त्यावेळचे केंद्र सरकार पांढरे निशाण फडकवत होते, अशी टीका त्यांनी केली.

काँग्रेसचा संशय सेनेवर

सर्जिकल स्ट्राईकनंतर काँग्रेसने भारताच्या सेनेकडेच पुरावा मागून आपल्या पराक्रमी सैनिकांचा अपमान केला होता. स्वत:च्या देशाच्या सैनिकांवर या पक्षाचा विश्वास नाही. असा पक्ष देशघातकी शक्तींविरोधात कारवाई करु शकणार नाही. सर्जिकल स्ट्राईकमुळे ‘भारत शत्रूच्या घरात घुसून त्याला मारु शकतो’ हा संदेश जगात सर्वत्र पसरला आहे. हा नवीन भारत आहे, असे आम्ही जगाला दर्शवून दिले आहे. दहशतवादी नरकात लपले तरी भारत सरकार त्यांना शोधून काढेल असा धाक आमच्या सेनेने बसविला आहे. काँग्रेसने मात्र, त्यावेळी भारताच्या सैनिकांवर संशय व्यक्त करुन पाकिस्तानची तळी उचलण्याचा कार्यक्रम चालविला होता. असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला.

हरियाणातील हिस्सारमध्ये सभा

जम्मूतील सभेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील हिस्सारमध्येही प्रचारसभेत भाषण केले. या भाषणात त्यांनी केंद्र सरकारने आणि हरियाणा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरीक यांच्यासाठी काय केले याची माहिती दिली. केंद्र सरकारची प्रत्येक योजना गरीबांनाच प्राधान्य देते. गेल्या दहा वर्षांमध्ये गरीबांसाठी जितके काम केंद्र सरकारने केले, तितके त्यापूर्वी कधीच झाले नव्हते असे ठाम प्रतिपादनही त्यांनी या सभेत केले.

भाजपला विजयाची शाश्वती

ड जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होण्याचा विश्वास

ड जम्मू-काश्मीरची हानी तीन कुटुंबांकडून, यावेळी त्यांचा एकाधिकार संपणार

ड घटनेचा अनुच्छेद 370 निष्प्रभ केल्याने प्रदेशाच्या विकासाचा मार्ग मोकळा

ड हरियाणातील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर घणाघात

Advertisement
Tags :

.