कर्नाटकातही भाजपच सत्तेवर येणार
पाच राज्यांच्या निकालानंतर आमदार भालचंद्र जारकीहोळींचा विश्वास
बेळगाव : पाच राज्यांतील निवडणूक निकाल लक्षात घेता 2028 मध्ये होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप संपूर्ण बहुमताने सत्तेवर येणार, असा विश्वास माजी मंत्री आरभावीचे आमदार व बेमुलचे अध्यक्ष भालचंद्र जारकीहोळी यांनी व्यक्त केला आहे. पाच राज्यातील निवडणूक निकालासंबंधी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना पाच राज्यांपैकी पश्चिम बंगाल, आसाम व पुदुचेरीमध्ये भाजपने घवघवीत विजय मिळविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली लोकहिताची कामे मतदारांनी मान्य केली आहेत. चाणक्य अमित शहा यांचे रणतंत्र पश्चिम बंगालमध्ये कामाला आले आहे, असे त्यांनी सांगितले. देशाच्या कानाकोपऱ्यात कमळ फुलले आहे. पक्षाचे कार्यकर्ते व निवडणुकीत विजय मिळविलेल्या सर्व नवनिर्वाचितांना अभिनंदन करतानाच कर्नाटकात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप सत्तेवर येणार, असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला आहे.