For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावर्डे मतदारसंघात भाजप विरुद्ध भाजप संघर्ष, विरोधक एकत्र आल्यास समीकरण बदलण्याची शक्यता, उमेदवारी कोणाला मिळणार?

01:48 PM Aug 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
सावर्डे मतदारसंघात भाजप विरुद्ध भाजप संघर्ष  विरोधक एकत्र आल्यास समीकरण बदलण्याची शक्यता  उमेदवारी कोणाला मिळणार
Advertisement

धारबांदोडा : भाजप विरुद्ध भाजप असा संघर्ष सध्या सावर्डे मतदारसंघात सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. एका बाजूने ‘आता माघार नाही’ अशी घोषणा ऐकू येते, तर दुसऱ्या बाजूने ‘निवडणूक लढविण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; मात्र त्यासाठी निदान पंचसदस्य म्हणून थोडाफार अनुभव असणे आवश्यक आहे,’ अशी खोचक प्रतिक्रिया ऐकू येते. या संघर्षाचा फटका भाजपला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Advertisement

सावर्डे मतदारसंघाची रचना 1989 साली झाली. त्यापूर्वी सांगे मतदारसंघाचा हा भाग होता. 2010 साली धारबांदोडा तालुक्याची निर्मिती झाली. तालुक्यातील 5 पंचायती व सांगे तालुक्यातील 2 पंचायतींचा सावर्डे मतदारसंघात समावेश आहे. सांगे मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. असे असूनही सावर्डे मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर आजपर्यंत या मतदारसंघात काँग्रेसला ही जागा जिंकता आलेली नाही. कारण सावर्डेत काँग्रेसचे लोक असूनही नसल्यासारखीच परिस्थिती आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिराबाग बंधाऱ्याला विरोध करून काँग्रेसचे सावर्डे गटाध्यक्ष संकेत भंडारी यांनी काँग्रेसमध्ये प्राण फुंकण्याचा थोडाफार प्रयत्न केला आहे.

हा मतदारसंघ भाजप व मगोचा बालेकिल्ला मानला जात आहे. 1989 च्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत मगो पक्षाचे मोहन आमशेकर विजयी झाले होते. त्यानंतर 1994 च्या निवडणुकीत मगो पक्षाचे विष्णू प्रभू यांनी विजय संपादन केला. 1999 व 2002 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे विनय तेंडुलकर विजयी झाले. 2007 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार उद्योगपती अनिल साळगावकर यांनीही प्रतिनिधित्व केले. 2012 च्या निवडणुकीत उद्योगपती अर्जुन साळगावकर यांचा पराभव करून भाजपचे गणेश गावकर विजयी झाले. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत मगो पक्षाला पुन्हा संधी देत दीपक पावसकर यांना मतदारांनी कौल दिला. मात्र मागील 2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे गणेश गावकर यांना पुन्हा संधी देण्यात आली. सध्या आमदार डॉ. गणेश गावकर हे विधानसभेचे सभापती आहेत. या मतदारसंघातील गणेश गावकर व विनय तेंडुलकर हे प्रदीर्घ काळ राजकारणात टिकलेले व कसलेले राजकारणी मानले जातात.

Advertisement

गणेश गावकर यांची तिरपी चाल

गणेश गावकर हे जरी स्पष्ट बोलणारे राजकारणी असले, तरी त्यांच्या मनात काय शिजत आहे, याचा सहसा कुणाला थांगपत्ता लागत नाही. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मतभेदांमुळे विखुरलेल्या राज्यातील एसटी समाजाच्या नेत्यांना व लोकांना एकत्रित आणून समाज एकसंध करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे राज्यातील राजकारणाला वेगळे वळण मिळाले आहे. एका दगडात अनेक पक्षी मारण्याची किमया साध्य करून त्यांनी आपली राजकीय मुत्सद्देगिरी दाखवली आहे. या मतदारसंघात भाजप व मगो सोडल्यास इतर पक्षांचे प्राबल्य नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. मात्र 2027 च्या निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप असे चित्र सध्याच्या घडीला तरी दिसून येते.

भाजपच्या उमेदवारीसाठी सभापती डॉ. गणेश गावकर, विनय तेंडुलकर, विनायक गावस व संकेत आर्सेकर हे इच्छुक आहेत. त्यापैकी मागच्या निवडणुकीत मगो पक्षातर्फे निवडणूक लढविलेल्या विनायक गावस यांनी हल्लीच भाजपात प्रवेश केलेला आहे. कोणत्याही परिस्थितीत आपण निवडणूक लढविणारच, अशी त्यांची एकंदर भूमिका आहे. गेल्या 30 वर्षांपासून धारबांदोडा पंचायतीवर त्यांचा प्रभाव आहे. सध्या मतदारांच्या संपर्कात ते आहेत. त्यामुळे भाजपचे तिकीट न मिळाल्यास ते भाजपमध्ये राहतील की इतर पक्षाची उमेदवारी स्वीकारतील किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील, याबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे.

विनय तेंडुलकर हे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. पक्षात राहून त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषविली आहेत. आपण यंदा निवडणूक लढविणार असल्याचे ते जाहीरपणे सांगतात. त्यांनी यादृष्टीने कामही सुरू केले आहे. मात्र गणेश गावकर यांना तिकीट मिळाल्यास आपण त्यांना पाठिंबा देऊ, असे उघडपणे सांगून त्यांनी अनेक संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे विनय तेंडुलकर यांच्या पाठिंब्याशिवाय सावर्डे मतदारसंघातील कोणताच उमेदवार विजयी होऊ शकत नाही, हे देखील खरे आहे. आणखी एक डाव खेळताना त्यांनी आपले पुत्र विनील तेंडुलकर यांना आतापासूनच मतदारसंघात सक्रिय करून आपली पुढील रणनीती स्पष्ट केली आहे.

संकेत आर्सेकर यांच्या प्रवेशाने अनेकांच्या भुवया उंचावल्या

संकेत आर्सेकर यांनी मतदारसंघात काम सुरू केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायक सचिव पदाचा त्यांनी राजीनामा दिला आहे. राजकीय परिपक्वता त्यांच्याकडे नाही, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. ‘आता माघार नाही,’ अशी गर्जना देऊन ते मोकळे झाले आहेत. त्यामुळे भाजपचे तिकीट न मिळाल्यास ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील का, हे पाहणे तेवढेच उत्कंठावर्धक ठरणार आहे. सभापती डॉ. गणेश गावकर व भाजपचे ज्येष्ठ नेते विनय तेंडुलकर यांसारखे दिग्गज असताना संकेत आर्सेकर यांनी मतदारसंघात केलेल्या प्रवेशाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अत्यंत धूर्त व अभ्यासू राजकारणी

डॉ. गणेश गावकर हे सावर्डे मतदारसंघाच्या विकासाचे खरे शिल्पकार मानले जातात. अत्यंत अभ्यासू राजकारणी अशी त्यांची ओळख आहे. विकासाच्या बाबतीत कोणीही त्यांचा हात धरू शकत नाही, ही त्यांची जमेची बाजू आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीत दोन्ही उमेदवारांना तसेच साकोर्डा पंचायतीच्या पोटनिवडणुकीत पुरस्कृत केलेला उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणून त्यांनी मतदारसंघावरील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

सावर्डे मतदारसंघातील उभरते युवा नेतृत्व व रिव्हॉल्यूशनरी गोवन्स पक्षाचे मागील उमेदवार विपीन नाईक यांनी पक्षातील अंतर्गत संघर्षामुळे राजीनामा दिला आहे. त्यामुळे या पक्षाचा उमेदवार रिंगणात असेल की नाही, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. आम आदमी पक्षाचा उमेदवार असला तरी फारसा फरक पडणार नाही. एकंदरीत भाजप, मगो, काँग्रेस, गोवा फॉरवर्ड व इतर पक्षांची युती झाल्यास समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘माझा मतदारसंघ, माझे घर’

स्वभावाने मनमिळावू असलेले माजी बांधकाममंत्री दीपक पावसकर यांनी निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट केले आहे. फोंड्यात राहूनही ते जास्तीत जास्त वेळ मतदारसंघात उपलब्ध असतात. सतत मतदारसंघात फेरफटका मारताना ते दिसतात. मध्यंतरी आरोग्याची तक्रार असूनही ज्याप्रमाणे त्यांनी मतदारांना वेळ दिला, ते पाहता मतदारसंघाबद्दल असलेली ‘माझा मतदारसंघ, माझे घर’ ही आंतरिक आत्मीयता अधोरेखित होत आहे, असे अनेकांचे मानणे आहे. भाजपच्या उमेदवारीचे ते प्रबळ दावेदार आहेत. तसेच गोवा फॉरवर्डच्याही संपर्कात आहेत. गोवा फॉरवर्डकडून त्यांना उमेदवारी मिळाल्यास व काँग्रेसशी युती झाल्यास आणखी काही समीकरणे जुळू किंवा बदलू शकतात.

Advertisement
Tags :

.