राहुल गांधींच्या 'शक्ती' वक्तव्यावर भाजप नाराज; निवडणूक आयोगाकडे धाव
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या 'शक्ती' टिप्पणी आणि उपस्थित केलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवरील शंकेवर भाजपने बुधवारी निवडणूक आयोगात धाव घेऊन तक्रार केली. 17 मार्च रोजी मुंबईत भारत जोडो न्याय यात्रेमध्ये जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी, "हिंदू धर्मात 'शक्ती' हा शब्द असून आम्ही एका शक्तीविरुद्ध लढत आहोत" अशी टिप्पणी केली होती.
राहूल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा 17 मार्चला मुंबईत समाप्त झाली. या यात्रेला इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली. यावेळी जाहीर सभेवेळी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जनसमुदायाल संबोधित करताना राहूल गांधी यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टिका केली होती.
यावेळी ते म्हणाले, "प्रश्न असा आहे की ती कोणती शक्ती आहे ? राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे हेच सत्य आहे. तसेच हा आत्मा ईव्हीएममध्ये आहे आणि देशातील ईडी, सीबीआय, आणि आयकर विभागात सुद्धा आहे." अशी उपरोधक टिका करताना मतदान यंत्रांशिवाय पंतप्रधान मोदी निवडणूक जिंकू शकत नाहीत, असा आरोपही राहूल गांधी यांनी केला.
राहूल गांधी यांच्या या टिकेनंतर केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी नवी दिल्लीतील भारतीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी वायनाडच्या खासदार राहूल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
राहुल गांधींच्या या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपकडून जोरदार टीका झाली. गेल्या दोन दिवसांत झालेल्या निवडणूकांच्या रॅलींमध्ये पंतप्रधानांनी हिंदू धर्मातील 'शक्ती' म्हणजे परमात्म्याचे मूर्तिमंत रूप आहे. पण विरोधी पक्ष ते नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच कोणीही 'शक्ती' नष्ट करू शकत नाही. ही लढाई 'शक्ती' नष्ट करणाऱ्या आणि 'शक्ती'ची पूजा करणाऱ्या दोन गटांमध्ये असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटले होते. .