बंगालमध्ये भाजपचा विजय, देशविरोधी शक्ती पराभूत!
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा विरोधकांवर हल्लाबोल : राजधानी पणजीसह अनेक शहरांमध्ये भाजपच्या मिरवणुका
पणजी : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या ऐतिहासिक आणि निर्विवाद यशामुळे काल सोमवारी गोव्याची राजधानी पणजी भगवेमय झाली होती. त्याचबरोबर म्हापसा, पेडणे, डिचोली, वाळपई, फोंडा, मडगाव, वास्कोसह अन्य शहरांमध्येही भाजपने विजयोत्सव साजरा केला. पणजीमध्ये भव्य ‘विजय बाईक रॅली’चे आयोजन करण्यात आले. रॅलीच्या प्रारंभी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना विरोधकांवर जोरदार प्रहार केला. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘पश्चिम बंगालमधील जनतेने हिंसाचार आणि दडपशाहीच्या राजकारणाला नाकारून विकासाला साथ दिली आहे. तिथे आता खऱ्या अर्थाने ‘खेल खतम’ झाला असून लोकशाहीचा विजय झाला आहे. हा निकाल भारतविरोधी शक्तींना चपराक आहे.
बंगालच्या सुपुत्राचा सन्मान
पश्चिम बंगाल ही जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जन्मभूमी आहे. तिथे भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार येणे, ही त्यांना मिळालेली सर्वात मोठी आदरांजली आहे. बंगालच्या मातीने अखेर आपल्या सुपुत्राचा सन्मान केला आहे, असे भावूक उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. देशात केवळ विकासाचे राजकारण चालेल, हे बंगालच्या निकालाने सिद्ध केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्रावर बंगालच्या जनतेने शिक्कामोर्तब केले असून, ही लाट आता थांबणार नाही, आणि कार्यकर्त्यांनीही आता न थांबता भाजपला सर्वोच्च शिखरावर नेण्यासाठी सदोदीत जागृत रहावे, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले.
2027 च्या विधानसभा निवडणुकीचे रणशिंग
बंगालमधील यशाचा उत्साह गोव्यातील कार्यकर्त्यांमध्ये दिसत असल्याचे सांगत मुख्यमंत्री सावंत म्हणाले, हा केवळ बंगालचा विजय नाही, तर ही 2027 च्या गोवा विधानसभा निवडणुकीची नांदी आहे. गोव्यात आगामी काळात भाजप 30 पेक्षा जास्त जागा जिंकून पुन्हा सत्तेत येईल, यात आता शंका उरलेली नाही, असेही ते म्हणाले.
पणजी शहरात उत्साहाचे उधाण
मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर हजारो कार्यकर्त्यांनी दुचाकींवरून पणजी शहरात रॅली काढली. हातात भाजपचे झेंडे आणि ‘भारत माता की जय’ तसेच ‘जय श्रीराम जय श्रीराम’ च्या घोषणांनी शहर दुमदुमून गेले होते. बंगालमधील विजयाचे प्रतीक म्हणून पणजी भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांना ‘झालमुरी’ (बंगाली भेळ) वाटण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी स्वत: कार्यकर्त्यांसोबत बसून भेळचा आस्वाद घेतला आणि जल्लोषात सहभाग नोंदवला.