For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बंगालमध्ये भाजप-तृणमूल कार्यकर्ते भिडले

07:05 AM Aug 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
बंगालमध्ये भाजप तृणमूल कार्यकर्ते भिडले
Advertisement

कोलकाता बलात्कार-हत्याप्रकरणी हिंसाचार : ‘बंद’वेळी भाजप नेत्याच्या गाडीवर गोळीबार, बॉम्बफेक

Advertisement

वृत्तसंस्था/कोलकाता

कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्येप्रकरणी विद्यार्थी संघटनांनी काढलेल्या निषेध मोर्चानंतर भाजपने बुधवारी 12 तासांच्या बंगाल बंदची हाक दिली होती. बंददरम्यान अनेक जिह्यांमध्ये पोलीस आणि भाजप समर्थकांमध्ये हाणामारी झाली. तसेच या बंदला विरोध करताना तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्तेही आमने-सामने आले होते. याप्रकरणी अनेक नेते-कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

Advertisement

भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम बंगाल बंदला हिंसक वळण लागल्याचे दिसत आहे. बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी बंददरम्यान उत्तर 24 परगणा जिह्यातील भाटपारा येथे भाजप नेते प्रियंगू पांडे यांच्या गाडीवर गोळीबार झाला. टीएमसीच्या सुमारे 50-60 लोकांनी हा हल्ला केला असून वाहनावर 6-7 राउंड फायर करण्यात आले आणि बॉम्ब फेकण्यात आले, असे त्यांनी स्पष्ट केले. या हल्ल्यात चालकासह दोघांना गोळ्या लागल्या. अन्य ठिकाणच्या घटनांमध्ये नादिया आणि मंगलबारी चौरंगी येथे भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. टीएमसी समर्थकांनी भाजप कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला केला. एकीकडे राज्यात बंद आणि आंदोलन सुरू असतानाच कोलकाता उच्च न्यायालयाने भाजपच्या बंगाल बंदला आव्हान देणारी जनहित याचिका फेटाळली आहे.

मंगळवारी राज्य सचिवालयावर मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या क्रूर पोलीस कारवाईच्या निषेधार्थ भाजपने बुधवारी सकाळी 6 वाजल्यापासून पश्चिम बंगालमध्ये 12 तासांच्या बंदची घोषणा केली होती. भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करताना पोलिसांनी अनेक भाजप कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतले आहे. मात्र, ममता सरकारने कोणताही बंद नसल्याचे सांगितले असून जे सरकारी कर्मचारी कार्यालयात न पोहोचणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता. या बंदवेळी सरकारी बसचालकांनी हेल्मेट घालूनच बस चालवल्याचे दिसून येत होते.

सीबीआयकडून ‘न्याय’ कुठे आहे? : ममता बॅनर्जी

बलात्कार-हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवून 16 दिवस उलटले आहेत. पण न्याय कुठे आहे? असा प्रश्न मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. भाजप पश्चिम बंगाल सरकारची बदनामी करत असल्याचा आरोप करत भाजपने कधीही उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

Advertisement
Tags :

.