For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिंदी भाषिक प्रदेशात भाजपला दणका

06:34 AM Aug 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
हिंदी भाषिक प्रदेशात भाजपला दणका
Advertisement

भाजपला साडेसाती सुरु झाली आहे का? असा कोणी प्रश्न विचारला तर त्याला नकाराचे उत्तर देणे धाडसाचे ठरेल. घटना अशा घडत आहेत की त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हादरून गेले नसतील असे मानणे देखील अवघड आहे. ते कधीच असे दाखवणे शक्य नाही पण कधीकधी देहबोली बोलून जाते तर कधीकधी कृतीतून माणूस उघडा पडतो. इंस्टाग्रामवर नुकतेच सक्रिय झालेले पंतप्रधान रात्री 12 वाजता रील टाकू लागले याचा अर्थ तहान लागल्यावर विहीर खोदायला सुरुवात झाली आहे असा होऊ शकतो. पण त्यावरूनही त्यांनी ‘व्हिक्टिम कार्ड’ खेळायचे सुरु करून स्वत:लाच अडचणीत आणलेले आहे.

Advertisement

‘मोदी हैं तो मुमकिन हैं’ चे दिवस सरू लागले आहेत काय? अशी शंका यावी आणि काहीजणांना तर खात्री पटावी असे एकानेक प्रसंग घडू लागल्याने जगातील सगळ्यात मोठ्या पक्षाची सुगी अचानक संपत आलेली आहे असे वाटू लागलेले आहे. बिहारमधील बांकीपूर या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला ज्या भयानक पराभवाला सामोरे जावे लागले आहे त्याने विरोधी पक्षात आनंदोत्सव सुरु झाला नसता तरच नवल होते. या पराभवाला विरोधी पक्ष कितपत जबाबदार हा प्रश्न गौण आहे कारण देशातील चित्र अचानक बदलू लागल्याचे ते एक प्रतिक आहे.

ज्यांना साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला ‘बॉस’ म्हटले त्या भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांच्या मतदारसंघात पक्षाची झालेली ही हालत हा पक्षाच्या डबल इंजिन सरकारांना तसेच पक्षाला एक जबर दणका आहे. ही निवडणूक जिंकून रणनीतीकार आणि जन सुराज पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी एकदम राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. किशोर यांनी अचानक या मतदारसंघात आपली उमेदवारी जाहीर करून 30 दिवसात भाजपची 30 वर्षांची मत्तेदारी मोडून काढली.

Advertisement

पण त्यापेक्षा मोठे काम या निवडणूकीने केले ते हे की त्याने एक नवीन न्यारेटिव्ह लोकांपुढे आणले. सर्व देशाला कामगार पुरवणारा बिहार स्वत:च्याच लोकांना नोकऱ्या का देऊ शकत नाही हा मध्यवर्ती मुद्दा पुढे करून किशोर यांनी भाजपच्या नसेवरच बोट ठेवले. धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण करून उत्तर भारतात गेली 12 वर्षे स्वत:च्याच पोळीवर तूप ओढून घेण्याची भाजपची रणनीती सपशेल फोल ठरवून या निवडणूकीने बिहारला तसेच देशाला एक नवीन दिशा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जातीपातीच्या राजकारणाने बरबटलेल्या बिहारमधील एका भाजपच्या शहरी बालेकिल्ल्यात कामाच्या मुद्यावर निवडणूक लढवून किशोर यांनी एक आगळा विक्रम केलेला आहे. बिहारची विधानसभा निवडणूक होऊन एक वर्षाच्या आतच राज्यात बदलाचे वारे वाहत आहे असे दाखवून या पोटनिवडणूकीने भाजपला हादरवले आहे. दिल्लीतील जंतर मंतर वरील आंदोलनाने केवळ धर्मेंद्र प्रधान यांचाच राजीनामा घेतलेला नाही तर त्याने तरुणाईची चळवळ आणि शिक्षण व बेकारीचे मुद्दे पुढे आणले आहेत. या आंदोलनाचा आणि त्याच्या मुद्यांचा आपल्या निवडणूकीत जोरदार वापर करून किशोर यांनी ढवळून काढलेले वातावरण बिहार सरकारला आणि तेथील मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना जड जाणार आहे. ‘नीट’ परीक्षा घोटाळा, विद्यार्थी आंदोलन, प्रधान यांचा राजीनामा, विद्यार्थी आंदोलनावर केलेल्या वादग्रस्त पेलेट गनचा वापर आणि त्यातून उत्पन्न झालेली गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी आणि पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे हा विरोधकांचा आग्रह या सर्व साखळीत बिहारची पोटनिवडणूक अलगद आलेली आहे.

राजीव गांधी हे सर्वशक्तिमान पंतप्रधान असताना अलाहाबाद मतदारसंघात व्ही पी सिंग यांनी काँग्रेसच्या सुनील शास्त्राr यांचा जवळजवळ 40 वर्षांपूर्वी केलेला लोकसभा पोटनिवडणूकीतील पराभव इतिहास घडवून गेला होता. 1988 साली झालेल्या या निवडणूकीने राजीव गांधी यांचे सिंहासन डोलू लागले आहे असा संदेश गेला आणि 1989च्या लोकसभा निवडणूकीत ते सिद्धही झाले. अमिताभ बच्चन यांनी अचानक लोकसभेचा राजीनामा देऊन राजकारण संन्यास घेत गांधी परिवाराशी दूरी साधली होती. 1987 साली झालेल्या हरियाणा विधानसभेच्या निवडणूकीत काँग्रेसला 90 पैकी केवळ 5 जागा मिळून विरोधकांच्या आशा पल्लवित केल्या होत्या. देवी लाल, व्ही पी सिंग, मुलायम सिंग यादव कामाला लागले होते. 1984 साली लोकसभेत केवळ 2 जागा मिळालेला भाजप पहिल्यापासूनच अस्वस्थ होता.

बांकीपूरचे महत्त्व अशासाठी की उत्तर भारतातील राजकीय तापमान कसे आहे हे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड, पंजाबसह चार राज्यांच्या निवडणूकांपूर्वी हे त्याने दाखवून दिलेले आहे. किशोर हे बांकीपूरचे रहिवासी नसूनदेखील आणि या मतदारसंघात उच्च वर्णियांची संख्या बहुसंख्य असूनही लोकांनी भाजपला झिडकारले हा संदेश सर्वदूर गेलेला आहे. मोदी 12 वर्षांपूर्वी पंतप्रधान झाल्यापासून युवावर्ग त्यांच्याबरोबर होता पण जंतर मंतरच्या आंदोलनाने त्याला छेद गेलेला आहे. भाजपच्या राज्यात शिक्षण क्षेत्रावर संघाचा पगडा असतो हे एक उघड गुपित आहे. जंतर मंतर आंदोलनाने संघालाही जागे केले असून सरसंघचालकांचा युवकांशी संवाद अचानक झालेला नाही. बांकीपूरवरून बिहारमध्ये देखील राजकारण सुरु झाले आहे. भाजपच्या पराभवानंतर एकाच दिवसांनी माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या संयुक्त जनता दलाच्या नेत्यांसह पंतप्रधानांची भेट घेऊन भाजपला अस्वस्थ केले आहे. किशोर यांनी ‘सम्राट चौधरी हटाव’ एककलमी कार्यक्रम सुरु केलेला आहे. नितीश यांना मुख्यमंत्रीपदावरून अलगदपणे काढून भाजपने आपल्या वर्चस्वाची खेळलेली खेळी हळूहळू अंगलट येणार की कसे हे येत्या काळातील घटनांवरून दिसेल. मुख्यमंत्री या नात्याने सम्राट चौधरी यांनी प्रभाव टाकलेला नाही हे या पोटनिवडणूकीने सिद्ध झालेले आहे. मध्यप्रदेशातील दतियाच्या पोटनिवडणूकीत काँग्रेसने जिंकत मोहन यादव सरकारला दणका दिलाय. या पोटनिवडणूकीत अमित शाह यांच्या जवळचे माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना तिकीट हवे होते. पण ते न मिळाल्याने मिश्रा यांच्या समर्थकांनी पंतप्रधानांच्या विरुद्ध घोषणाबाजी करून राज्य भाजपमधील दुफळीच समोर आणली. मिश्रा यांना तिकीट डावलण्याचे काम साक्षात पंतप्रधानांनी केले असे दावे होत आहेत. जनसंघाच्या काळापासून तो पक्ष म्हणजे ‘हिंदी, हिंदू, हिंदुस्तान’ला वाहिलेला आहे असा झालेला समज भाजपची 50 वर्षे होत आली तरी पुसला गेलेला नाही.

सुनील गाताडे

Advertisement
Tags :

.