पोटनिवडणुकांमध्ये भाजपला धक्का
बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर विजयी, भाजप-काँग्रेस 1-1 : गुजरातमधील मांजलपूरची जागा भाजपने राखली
वृत्तसंस्था
नवी दिल्ली
बिहार, मध्यप्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांमधील प्रत्येक एक विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाला एक जागा गमवावी लागली आहे. बिहारमधील प्रतिष्ठेच्या बांकीपूर मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे प्रशांत किशोर यांनी भारतीय जनता पक्षाचा पराभव केला. गुजरातमधील मांजलपूरची जागा भारतीय जनता पक्षाने मोठ्या अंतराने राखली असून मध्यप्रदेशातील दतियाची जागा काँग्रेसने राखली आहे. बांकीपूर हा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचा मतदारसंघ होता. आता ते राज्यसभेवर निवडून आले आहेत.
या विधानसभा जागांपैकी पूर्वी भारतीय जनता पक्षाकडे 2 आणि काँग्रेसकडे 1 जागा होती. तथापि, बांकीपूरची जागा गमवावी लागल्याने भारतीय जनता पक्षाला धक्का बसला आहे. मांजलपूर हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. तो याच पक्षाकडे राहिला आहे. तर मध्यप्रदेशातील दतिया मतदारसंघ नेहमी काँग्रेसच्या प्रभावात राहिला आहे. या पोटनिवडणुकीतही तो याच पक्षाकडे राहिला.
तिन्ही मतदारसंघांमधील जनतेचा कौल
बांकीपूर
प्रशांत किशोर (जनसुराज पक्ष) यांचा या मतदारसंघात 19,324 मतांच्या आधिक्क्याने विजय झाला आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांचा पराभव केला. प्रशांत किशोर यांची ही प्रथम निवडणूक होती. या निवडणुकीत यश मिळवून त्यांनी निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश केला आहे.
दंतिया
मध्यप्रदेशातील या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार घन:श्याम सिंग यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अशुतोष तिवारी यांचा 6 हजार 16 मतांच्या आधिक्क्याने पराभव केला आहे. पूर्वी ही जागा काँग्रेसकडेच होती. तथापि, काँग्रेसच्या आमदाराची निवडणूक रद्द झाल्याने ही पोटनिवडणूक घ्यावी लागली आहे.
मांजलपूर
गुजरातमधील या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे सतेंदरभाई पटेल यांनी काँग्रेसचे उमेदवार भिखाभाई रबारी यांचा 3 हजार 630 मतांच्या मोठ्या आधिक्क्याने पराभव केला आहे ही जागा पूर्वी भारतीय जनता पक्षाकडेच होती. तथापि, या पक्षाच्या आमदाराचे निधन झाल्याने पोटनिवडणूक घेतली गेली आहे.