भाजप प्रदेशाध्यक्ष प्रश्नाचे 20 फेब्रुवारीपर्यंत उत्तर
प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांचे माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
भाजप प्रदेशाध्यक्षपदाच्या प्रश्नाचे उत्तर 20 फेब्रुवारीपर्यंत मिळणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार बी. वाय. विजयेंद्र यांनी दिली. रविवारी तुमकूर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीनंतर प्रदेशाध्यक्षपदाची बाब कळणार आहे. दिल्लीत प्रक्रिया सुरू असून केंद्रातील वरिष्ठ नेते लवकरच राज्यात येणार आहेत. सर्व आमदारांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय शिस्तपालन समितीने आमदार बसनगौडा यत्नाळ-पाटील यांना नोटीस बजावली आहे. त्यासाठी 72 तासांची मुदतही देण्यात आली होती. त्यावर काय झाले, जे घडत आहे त्यावर मी भाष्य करणार नाही. केंद्रातील वरिष्ठ सर्व गोष्टींचे निरीक्षण करत आहेत. यत्नाळ यांना नोटीस देण्याची ताकद नाही, या मंत्री राजण्णा यांच्या वक्तव्याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, राजण्णा आमच्या पक्षाचे आहेत का? ते काँग्रेस पक्षाचे आहेत. त्यांच्या वक्तव्यावर आपण प्रतिक्रिया देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठे बंद करणे दुर्दैवी
विद्यापीठे बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाबाबत उत्तर देताना ते म्हणाले, विद्यापीठे बंद असणे दुर्दैवी आहे. भाजप सरकारच्या काळात सुरू झालेली नवीन विद्यापीठे बंद करण्याचे काम सरकार करत आहे. या विद्यापीठांना 300 कोटी, 400 कोटी ऊपये अनुदान देणे गरजेचे आहे. अनुदान मिळाल्यास विद्यापीठे काम करू शकतील. त्यामुळे गरीब मुलांना मदत होईल. या निर्णयामुळे काँग्रेस सरकारचे चांगले होणार नाही, अशी टीकाही विजयेंद्र यांनी केली.