भाजप प्रदेशाध्यक्षांची उद्या होणार घोषणा
सुनील बन्सल यांच्या उपस्थितीत आज निवडणूक
पणजी : गोमंतकीयांना आणि खास करून भाजप गोटात उत्सुकता लागून राहिलेल्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी अखेर आज निवडणूक होत आहे. त्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडणार आहे. गुऊवारी पणजीत भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाचे राज्य निवडणूक अधिकारी प्रेमानंद म्हांबरे यांनी ही माहिती दिली. त्यावेळी सहअधिकारी केशव प्रभू यांचीही उपस्थिती होती.
भाजप प्रदेशाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते दामू नाईक यांचे नाव जवळजवळ निश्चित झाले असले तरी एक औपचारिकता म्हणून ही निवडणूक प्रक्रिया आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ही निवड बिनविरोध न झाल्यास 59 मतदार आपला हक्क बजावून उमेदवाराची निवड करतील. त्यानंतर उद्या शनिवारी सकाळी 10 वा. विजयी उमेदवाराची अधिकृत घोषणा करण्यात येईल. त्यासाठी येथील गोमंतक मराठा समाज सभागृहात कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, असे म्हांबरे यांनी सांगितले.
भाजपने गत दि. 2 सप्टेंबरपासून राज्यात सदस्यता नोंदणी सुरू केली होती. त्या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व सुमारे 4.25 लाखापेक्षा जास्त नागरिकांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. राज्यातील 40 पैकी 36 मतदारसंघांमध्ये मंडळ अध्यक्ष निवडण्यात आले असून जिल्हाध्यक्षांचीही निवड जाहीर करण्यात आली आहे, अशी माहितीही म्हांबरे यांनी दिली.