आंध्र प्रदेश, तेलंगणातील भाजप प्रदेशाध्यक्ष घोषित
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यांसाठी भारतीय जनता पक्षाने नव्या प्रदेश अध्यक्षांची घोषणा केली आहे. दोन्ही राज्यांमध्ये ज्येष्ठ नेत्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तेलंगणासाठी या पक्षाने एन. रामचंद्र राव यांची प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. ते दिवंगत नेते अरुण जेटली यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात असत. आंध्र प्रदेशात ही धुरा पी. व्ही. एन. माधव यांच्यावर सोपविली आहे. माधव हेही ज्येष्ठ नेते असून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. त्यांचे पिता पी, चलपती राव हे देखील याच पक्षाचे नेते होते.
तेलंगणात प्रदेश अध्यक्षांची निवड करण्याचे आव्हान भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत जटील होते. या स्थानासाठी तीव्र स्पर्धा होती. या पक्षाचे अनेक खासदारही या पदासाठीच्या स्पर्धेत होते. या स्पर्धेमुळे अनेकदा प्रदेशाध्यक्षपदासाठीची नियुक्ती पुढे ढकलण्यात आली होती. अखेर या पदासाठी एन. रामचंद्र राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे एकट्याचेच आवेदन पत्र सादर झाल्याने त्यांचीच निवड होणार हे निश्चित होते. सर्वसहमतीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे प्रतिपादन पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनी केले आहे.
टी. राजा सिंग यांचा पक्षाचा राजीनामा
तेलंगणात नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड झाल्यानंतर पक्षात बंड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षाचे एक आक्रमक नेते आणि आमदार टी. राजासिंग यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पक्षसदस्यत्वाचा आणि आमदारपदाचा राजीनामा पक्षाच्या नेतृत्वाकडे पाठविला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तथापि, भारतीय जनता पक्षाकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. ते पक्ष सोडणार नाहीत, हे पाहण्याचे उत्तरदायित्व नव्या प्रदेश अध्यक्षांवर आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. अन्य काही नेतेही नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने लक्ष घालण्याची आवश्यकता निर्माण झाली असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश न•ा हे या घडमोडींची नोंद घेत आहेत.
राष्ट्रीय अध्यक्षांची निवड प्रक्रिया गतीमान
आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यांमधील प्रदेशांध्यक्षांची निवड आता करण्यात आल्याने पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रियाही गतीमान होणार आहे, असे मत व्यक्त केले जात आहे. ही निवड येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड होणार, या संबंधीची उत्सुकता आता चांगलीच ताणली गेली आहे.