उत्तर प्रदेशात भाजप-सप वाद भडकला
जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीचे निमित्त
► वृत्तसंस्था / लखनौ
जनता पक्षाचे संस्थापक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीच्या निमित्ताने उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्यात वाद उफाळून आला आहे. शुक्रवारी जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीदिनी सप नेते अखिलेश यादव गोमतीनगर येथील जयप्रकाश नारायण स्मारकाच्या परिसरात त्यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्यासाठी जाणार होते. तथापि, सुरक्षेचे कारण असल्याने त्यांनी तेथे जाऊ नये, अशी सूचना स्थानिक प्रशासनाने केली होती. तसेच स्मारकाचा परिसर सील करण्यात आला होता. त्यामुळे यादव यांनी आपल्या निवासस्थानाच्या बाहेर रस्त्यावर जयप्रकाश नारायण यांचा पुतळा एका वाहनावर बसून त्याला हार अर्पण केला. यावेळी समाजवादी पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
शुक्रवारी जयप्रकाश नारायण यांची जयंती असल्याने समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते स्मारकाच्या परिसरात जाऊन त्यांच्या पुतळ्याला हार अर्पण करणार आहेत, अशी पूर्वसूचना प्रशासनाला देण्यात आली होती, असे समाजवादी पक्षाचे म्हणणे आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना तेथे जाऊ न देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. तसेच स्मारक परिसराची बॅरिकेड्स लावून नाकाबंदी करण्यात आली होती.
निवासस्थानाबाहेर गर्दी
जयप्रकाश नारायण यांना आदरांजली वाहण्यासाठी समाजवादी पक्षाचे अनेक कार्यकर्ते अखिलेश यादव यांच्या निवासस्थानी जमले होते. तेथून ते स्मारकाकडे जाणार होते. मात्र, स्मारक परिसराची नाकाबंदी करण्यात आल्याने त्यांना तसे करता आले नाही. यावर यादव यांनी संताप व्यक्त केला. ही लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप त्यांनी केला. भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षांवर अन्याय आणि अत्याचार करीत असून दबाव टाकण्याच्या प्रयत्नात आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले. स्थानिक प्रशासनाने मात्र या आरोपांचा इन्कार केला आहे.
पाठिंबा काढण्याचे आवाहन
भारतीय जनता पक्षाच्या उत्तर प्रदेश सरकारने जयप्रकाश नारायण यांचा अपमान केला आहे. त्यामुळे संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी भारतीय जनता पक्षाच्या सरकारला केंद्रात दिलेला पाठिंबा काढून घ्यावा, असे आवाहनही अखिलेश यादव यांनी केले आहे. जयप्रकाश नारायण यांनी लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी आपले आयुष्य पणाला लावले होते. पण आता भारतीय जनता पक्ष याच लोकशाहीची पायमल्ली करीत आहे. नितीश कुमार हे जयप्रकाश नारायण यांचेच अनुयायी असल्याने त्यांनी हा अपमान सहन करु नये. त्यांनी पाठिंबा काढून घ्यावा, अशी आग्रही मागणी अखिलेश यादव यांनी शुक्रवारी केली.
भाजपची खोचक प्रतिक्रिया
ज्या लोकशाहीची भाषा अखिलेश यादव करतात, त्या लोकशाहीचा गळा काँग्रेसने आणीबाणीच्या काळात घोटला होता. त्यावेळी जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेसच्या विरोधात देशव्यापी आंदोलन करुन सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणले होते. याच काँग्रेसशी आज समाजवादी पक्षाची युती आहे. अशा स्थितीत समाजवादी पक्षाने भारतीय जनता पक्षाला लोकशाही शिकवावी, हा मोठा विनोद आहे. अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाने या घटनेवर व्यक्त केली आहे.