Hupri Municipal Council : हुपरी नगरपालिकेत भाजप-शिंदे गटाचा भक्कम विजय
हुपरी नगरपरिषदेत भाजप-शिंदे गटाचे निर्विवाद वर्चस्व
हुपरी : हुपरी ता हातकणंगले येथील बहुचर्चित असलेल्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत मनसे, स्वाभिमानी, शेतकरी संघटना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या युवक क्रांती आघाडीचा धुवा उडवत भाजपने नगराध्यक्षपदासह शिवसेना शिंदे गटाच्या मदतीने 21 पैकी 19 जागावर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व स्थापित केले. यामध्ये भाजप 15, शिवसेना शिंदे गट 4 तर विरोधी युवक क्रांती आघाडीला 2 जागावर समाधान मानावे लागले. नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून रिंगणात असलेले मंगलराव माळगे यांनी अखिल भारतीय हिन्दू महासभेकडून आश्चर्यकारक उमेदवारी घोषित केलेल्या रमेश भोरे यांच्यावर मात करत 6079 मतांनी विजय मिळविला.
हुपरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी 6 उमेदवार तर 10 प्रभागात 21 नगरसेवकपदासाठी 92 उमेदवार रिंगणात उभे होते. आमदार राहुल आवाडे, जवाहरचे संचालक सुरज बेडगे, मंडळ अध्यक्ष सुभाष गोटखिंडे यांच्यासह भाजपच्या इतर नेत्यांनी सुरूवातीपासून प्रचाराची धुरा सांभाळत शिंदे गट, जनस्वराज्य व आरपीआयची युती करत मंगलराव माळगे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह 21 उमेदवारांचे तगडे आव्हान निर्माण केले होते. तर त्याला सुरुंग लावण्यासाठी मनसेने तालुकाध्यक्ष दौलत पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांना हाताशी धरून सुनील धोंगडे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह 21 उमेदवारांची एक भक्कम अशी आघाडी स्थापन केली होती. एकीकडे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने 8 तर शिवसेना उबाठा पक्षाने एकला चलो रे चा नारा देत सर्वच प्रभागांमध्ये 21 उमेदवार रिंगणात उभे केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)गटाने 9उमेदवार रिंगणात उतरवले होते.तसेच माजी नगरसेवक संदीप वाईंगडे यांनी अपक्षांची मोट बांधत 5 उमेदवार रिंगणात उतरले होते. तर हिंदू महासभा समितीने रमेश भोरे यांना फक्त नगराध्यक्ष पदासाठी उभे करत दंड थोपटले होते.
त्यामुळे हुपरीत बहुरंगी लढत पहावयास मिळाली. अखेरीस हुपरीतील मतदारांनी भाजप व शिवसेना शिंदे गटाला एकहाती सत्ता देत भाजप व शिंदे गटातील 19 उमेदवारांना भरभरून मतदान केले तर युवक क्रांती आघाडीला 2 जागांवर समाधान मानावे लागले. विजयी उमेदवारांनी शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढून गुलाल व फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला.
भाजपचे प्रभाग क्र 3 मधील उमेदवार अमेय जाधव हे प्रभाग क्र 5 मधील उमेदवार अलका मोहन वाईंगडे यांचे जावई असून दोन्ही उमेदवार भाजपकडून विजयी झाल्याने जावई व सासू नगरपरिषदेत एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे
नगराध्यक्ष ( भाजप ) - मंगलराव माळगे
नगरसेवक (भाजप ) - गणेश वाईंगडे, नम्रता रंजीत कांबळे, अमर माने, अमेय जाधव, भारती नायकवडे, रेवती मनोज पाटील, स्वप्निल हुपरीकर, अलका वाईंगडे, आण्णासो शेंडुरे, ऋतुजा गोंधळी, शितल कांबळे, प्रकाश उर्फ बाळासाहेब रणदिवे, माधुरी मुधाळे, सागर माळी, संतोष वाळवेकर
शिंदेसेना - रूपाली अजित उगळे, संदीप आपटे, सोनाली जाधव, रोहित उर्फ गोपी शेटे
युवक क्रांती आघाडी - गीतांजली दौलतराव पाटील, सरिता कौंदाडे.