भाजप ‘संघ’नायक निवड मार्चमध्ये
भारतीय जनता पक्षाचे विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काही काळापूर्वी संघाची आम्हाला आता पूर्वीसारखी गरज उरलेली नाही. भाजप देशभर पसरलेला मोठा पक्ष आहे असे म्हटले होते. नड्डा यांना काय सांगायचे होते ते त्यांनाच माहित पण स्वयंसेवकांना हे विधान पसंत पडले नाही आणि चारशे पार ही घोषणा घोषणाच राहिली आणि मोदींना केंद्रात सत्ता राखण्यासाठी कुबड्या घ्याव्या लागल्या. न•ांचा कार्यकाळ संपून बराच काळ ओलांडला आहे पण भाजपाच्या घटनेनुसार किमान अठरा राज्यातील संघटनात्मक निवडणूका पूर्ण होत नाहीत तोवर राष्ट्रीय अध्यक्ष निवडणूक होत नाही. त्यातच त्यावेळी तोंडावर लोकसभा आणि महाराष्ट्र, हरियाणा अशा निवडणूका होत्या. म्हणून नड्डा यांना मुदत संपूनही वाढीव कार्यकाळ मिळाला पण आता त्यांचा उत्तराधिकारी निवडला जाणार हे स्पष्ट झाले आहे. नवीन अध्यक्ष मार्चमध्ये कार्यभार सांभाळतील असे सध्यातरी भासते आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर होईल व निवडणूक पूर्ण होऊन पंधरा मार्चपूर्वी नवे अध्यक्ष निवडले जातील अशी अटकळ आहे. नवीन अध्यक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सल्ला घेऊनच निवडला जाणार असेही दिसून आले आहे. भाजपचा अध्यक्ष ठरवला जातो सहमती होते आणि निवडणूक बिनविरोध होते या घटनाक्रमाला नितीन गडकरी अपवाद आहेत. त्यांच्या विरोधात अर्ज भरला गेला. नंतर दोघांनी माघार घेतली व राजनाथसिंह अध्यक्ष झाले होते. टीम भाजपाचा नवा कॅप्टन कोण होणार तो उत्तरेतून असेल की दक्षिणेतून असेल तसेच महिला असेल की पुरुष या बरोबरच वेगवेगळे तर्क केले जात आहेत पण न•ांना पुन्हा संधी नाही आणि अध्यक्ष रा. स्व. संघाच्या मर्जीतील असेल असे स्पष्ट दिसते आहे. भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो आणि पाठोपाठ दोन टर्म अध्यक्ष निवडणूक लढवता येते. तिसऱ्यांदा भरलेला अर्ज नियमाने अपात्र ठरतो, न•ा एकदाच बिनविरोध विजयी झाले आहेत पण त्यांचा कार्यकाळ जवळजवळ पाच वर्षे होत आला आहे. संघाला ते नको आहेत. त्यामुळे त्यांना नारळ मिळणार हे निश्चित आहे. गेल्या आठवड्यात भाजप व संघ यातील प्रमुखांची एक बैठक झाली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, सरसंघचालक मोहन भागवत आणि कार्यवाह होसबले वगैरे उपस्थित होते. या बैठकीत अनेक नावांवर चर्चा झाली आणि आगामी निवडणुका वगैरे गोष्टी लक्षात घेऊन विचारविनिमय करण्यात आला. पण कोणत्याही नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाले नाही. रा. स्व. संघ प्रत्यक्ष राजकारणात भाग घेत नाहीत. पण मागितला तर सल्ला आणि संघटन नेटके करण्यासाठी संघटक देत असतो हे संघटक समन्वय साधत असतात. राज्यातही तशीच पद्धत असते. संघ व भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत नेमके कोणते नाव पुढे आले हे स्पष्ट झाले नाही पण या बैठकीत अनेक नावांचा विचार झाला अशी वार्ता आहे. भाजपला, कर्नाटक, आंध्र, केरळ, तामिळनाडू या दक्षिण भारतात म्हणावे तसे यश आलेले नाही आणि समोर दक्षिण भारतातील विधानसभा निवडणूका आहेत. त्यामुळे तेथील अध्यक्ष निवडावा या विचाराने काही नावांवर चर्चा झाली. त्यामध्ये काही नावांचा साधक बाधक विचार झाला. आंध्रातील व्यंकय्या नायडू भाजपचे वीस वर्षांपूर्वी अध्यक्ष निवडले होते पण त्यामुळे दक्षिण विजय शक्य झाला नव्हता. अध्यक्ष पदासाठी विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारामन याच बरोबर स्मृती इराणी यांच्या नावाचा विचार झाला. पण मंत्रीपद व संघटनात्मक पद एकाच व्यक्तीकडे फार काळ असू नये या नियमावर बोट ठेवण्यात आले. निर्मला सीतारामन यांनी अर्थमंत्रालय चांगले सांभाळले आहे, त्यांना अध्यक्षपद नको असाही विचार मांडला गेला. धर्मेद्र प्रधान यांच्या बाबतीतही तोच मुद्दा पुढे आला. भाजपच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर असणारे नाव किशन रेड्डी यांचे आहे. सध्या ते केंद्रीय कोळसा मंत्री आहेत. दक्षिणेतील प्रमुख भाजप नेत्यांमध्ये प्रल्हाद जोशी, एल. मुरुगन, जी. किशन रेड्डी, के. अण्णामलाई, के ईश्वरप्पा आणि निर्मला सीतारामन यांचा समावेश आहे. जर संघटनेने निर्मला सीतारामन यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली, तर त्यांनी यावेळी सादर केलेला अर्थसंकल्प त्यांचा शेवटचा ठरणार. तसेच, भाजपाच्या इतिहासात एक नवीन विक्रम नोंदवला जाईल. भाजपमध्ये आतापर्यंत या पदावर एकाही महिलेची नियुक्ती झालेली नाही. अध्यक्ष पदासाठीचे तगडे नाव जे किशन रेड्डी हे तेलंगणा राज्याचे पक्षाध्यक्ष राहिले आहेत. संघटनेत त्यांनी उत्तम काम केले होते. तेलंगणामध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने आपला प्रभाव पाडला होता त्यात रेड्डी यांची मोठी भूमिका होती.
भाजपाच्या दक्षिण विजयाला ते पोषक ठरतील अशी अटकळ बांधली जात आहे आहे. संजय कुमार हेही अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीचे नाव आहे. हिंदुत्व विचारसरणी आक्रमक पद्धतीने त्यांनी लोकांपर्यंत पोहचवली आहे. ते प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. त्यावेळी आक्रमक आंदोलनामुळे त्यांनी नवी ओळख तयार केली होती. संघटन कौशल्य, लोकप्रियता आणि तळागाळापर्यंत पोहच यामुळे ते अध्यक्ष होऊ शकतात. आता भाजप श्रेष्ठी कुणाचे नाव निश्चित करतात आणि कुणाला अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसवतात हे बघावे लागेल. पण हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. आणि दक्षिण विजय हे लक्ष आहे. टीम भाजपाचा संघनायक कोण होणार हे लवकरच स्पष्ट होईल. जगातील सर्वात मोठ्या संघटनेचा अध्यक्ष कोण होणार ही उत्सुकता असली तरी ती फार ताणली जाणार नाही.