BJP Political : भाजपच्या जिल्हाध्यक्षपदासाठी कडेगावच्या देशमुख बंधूंमध्ये चुरस!, कोण मारणार बाजी?
लोकसभा निवडणुकीच्या काळापासून पृथ्वीराज देशमुख आणि संग्रामसिंह देशमुख यांच्या वाटा वेगळ्या झाल्या
सांगली : भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी मंगळवारी शिरढोण येथे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यामध्ये शहराप्रमाणेच ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठीसुद्धा प्राधान्यक्रमाने बंद लिफाफ्यातून मते जाणून घेण्यात आली. माजी आमदार आणि माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख या दोन चुलत भावांमध्ये अध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काळापासून पृथ्वीराज देशमुख आणि संग्रामसिंह देशमुख यांच्या वाटा वेगळ्या झाल्या आहेत. पक्षातील एका गटाची सहानुभूती संग्रामसिंह देशमुख यांच्या बाजूने आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत पक्षाचे काम करून संजयकाका पाटील यांना मदत केल्याने त्यांच्यावर एक गट पुरता नाराज आहे. संजयकाका पाटील यांना विरोध म्हणून पृथ्वीराजबाबा देशमुख यांचे नाव पुढे आणले आहे. ग्रामीण जिल्हाध्यक्षपद किंवा विधान परिषदेची आमदारकी यासाठी पृथ्वीराज देशमुख यांच्या नावाचा विचार करावा असे त्यांचे मत आहे.
यापूर्वी त्यांच्या काळातच पक्षाने जिल्हा बँक, जिल्हा परिषद आणि इतर निवडणुकांमध्ये यश मिळवले अशी त्यांची बाजू सांगितली जात आहे. तर संग्रामसिंह देशमुख यांच्याबाबत जिल्ह्यात असणारे चांगले वातावरण, जिल्हा परिषद आणि जिल्हा बँकेमध्ये त्यांनी केलेली कामगिरी, संघटन कौशल्य या जोरावर त्यांना जिल्हाध्यक्ष करण्यात यावे अशी एका गटाची भूमिका आहे. पदवीधर मतदार संघात त्यांनी घेतलेल्या मतांचाही त्यासाठी हवाला दिला जात आहे.
अर्थात, पक्षात केवळ देशमुख बंधूंच्या नावाचा विचार झाला नसून मतदानाच्या वेळी विलास काळेबाग, मिलिंद कोरी या इच्छुकांच्या नावांचीही चर्चा झाली. आजी, माजी आमदार, विद्यमान दोन्ही जिल्हाध्यक्ष, पक्षाचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हा सरचिटणीस, महिला व युवा मोर्चा तसेच मागासवर्गीय मोर्चाचे पदाधिकारी यांनी प्राधान्यक्रमाणे पहिली तीन नावे बंद पाकीटातून पक्ष निरीक्षकांच्या हाती सोपवली आहेत.
पक्षात प्रभाव कोणाचा ते स्पष्ट होणार!
शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी झालेली रिंग आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये असणारे दोन गट या सर्वांना विचारात घेऊन पक्ष कोणाची निवड करते याकडे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. या निवडीवर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, पक्षाचे विद्यमान आमदार आणि पक्षातील प्रभावी आजी-माजी लोकप्रतिनिधी यांचा कसा प्रभाव पडतो आणि कोणाचा शब्द जिल्ह्याच्या बाबतीत अंतिम मानला जातो हेही या निवडीतून स्पष्ट होणार आहे.