For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पदवीधरमुळे कोकणात भाजपला पुन्हा ऊर्जा, काँग्रेस बॅकफुटवर

01:04 AM Jul 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
पदवीधरमुळे कोकणात भाजपला पुन्हा ऊर्जा  काँग्रेस बॅकफुटवर
Advertisement

कोकण पदवीधर मतदारसंघात भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी विजयाची हॅट्ट्रीक साधताना महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर (काँग्रेस) यांच्याविरोधात मोठा विजय संपादन केला. खरे तर लोकसभा निवडणूक निकालानंतर लगेचच झालेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीला लोकसभेप्रमाणे लक्षवेधी मते मिळतील, अशी अपेक्षा होती. पण व्यक्तिगत संपर्क, मागील दोन निवडणुकांचा अनुभव आणि भाजपकडे असलेल्या यंत्रणेच्या जोरावर डावखरेंनी ती फोल ठरवली.

Advertisement

लोकसभेनंतर कोकणात पुन्हा एकदा भाजपचे कमळ फुलले. अर्थात पदवीधर निवडणूक निकालावरून विधानसभेचे अंदाज बांधणे तसे संयुक्तिक नाही. पण या विजयामुळे कोकणातील महायुतीला पुन्हा एकदा सकारात्मक उर्जा मिळाली. तर लोकसभा निवडणूक निकालानंतर रत्नागिरीत विधानसभेच्या दोन जागांचा आग्रह धरणारा काँग्रेस पक्ष मात्र महाविकास आघाडीमध्ये काहीसा बॅकफूटवर गेला आहे. कारण ही जागा मिळवण्यासाठी काँग्रेसने खूप जोर लावला होता. पण काँग्रेसला निवडणुकीत चांगली कामगिरी करता आली नाही.

विधानपरिषदेच्या निवडणुकांचे मुंबई आणि कोकणातील निकाल हे साधारणत: लोकसभेसारखेच लागले आहेत. मुंबईत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा बोलबाला राहिला आहे. तर कोकणात पुन्हा भाजपचे पारडे जड राहिले आहे. वास्तविक कोकण पदवीधरच्या जागेवरून महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरे सेनेमध्ये जोरदार रस्सीखेच पहावयास मिळाली होती. ठाकरे सेनेकडून अशोक जैन यांचा उमेदवारी अर्जही दाखल केला होता. पण वरिष्ठ स्तरावर यशस्वी तोडगा निघाल्यानंतर काँग्रेसचे रमेश कीर हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ठरले. नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मिळालेले यश पाहता कोकण पदवीधरमध्ये चुरशीने मतदान होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. पण मतांची आकडेवारी पाहता ही लढत फार चुरशीची झालेली नाही, हे स्पष्ट होते. डावखरेंना 1 लाख 719 मते मिळाली तर रमेश कीर यांना 28 हजार 585 मते मिळाली. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला कोकणसह राज्यभरात झालेले मतदान पाहता पदवीधरमधील त्यांचा परफॉरमन्स फार चांगला झाला नाही, असे म्हणावे लागेल. एका अर्थाने विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेने कोकण या आपल्या बालेकिल्ल्यातील पदवीधरची जागा काँग्रेसला सोडून जो एक सावध पवित्रा घेतला तो त्यांच्या दृष्टीने योग्य ठरला. कारण निरंजन डावखरे यांचे आव्हान तसे तगडेच होते. अशात ठाकरे सेनेच्या उमेदवाराचा जर पदवीधरमध्ये पराभव झाला असता तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणात महायुतीकडून त्याचे मोठे राजकीय भांडवल केले जाण्याची दाट शक्यता होती.

Advertisement

पदवीधर मतदारसंघात कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि ठाणे या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. यापैकी एकट्या ठाणे जिल्ह्यात जवळपास 99 हजार म्हणजे सुमारे 45 टक्के मतदार आहेत आणि ठाणे हे डावखरेंचे होमपिच आहे. त्या खालोखाल 60 हजारच्या आसपास मतदार रायगडात आहेत. सर्वसामान्यपणे ठाणे व रायगड हे दोन जिल्हेच या मतदारसंघाचा निकाल लावतात. सर्वात कमी मतदार सिंधुदुर्गात आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यात 23 हजार मतदार आहेत. कोकण विभागातील पाचही जिल्ह्यांच्या आकडेवारीनुसार कोकण पदवीधरसाठी 64.14 टक्के इतके मतदान झाले होते. 84 हजार 6665 पुरुष, 58 हजार 632 स्त्राr असे एकूण 1 लाख 43 हजार 297 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजप आणि महायुतीची ताकद पाहता डावखरेंच्या विजयाची शक्यता जास्त होती आणि अपेक्षेप्रमाणे मोठा विजय मिळवण्यात ते यशस्वी झाले. पण विधानसभेसाठी रत्नागिरीत दोन जागांची मागणी करणाऱ्या काँग्रेसला मात्र अपेक्षित कामगिरी करता आली नाही. खरे तर कोकण हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवाय ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कोकण पदवीधर मतदारसंघात मतदार नोंदणीसाठी खूप मेहनत घेतली होती. उमेदवारीवरून महाविकास आघाडीतील काँग्रेस व शिवसेना या दोन प्रमुख पक्षांमध्ये मोठी रस्सीखेच झाली. पण चर्चेच्या अंतिम टप्प्यात महाविकास आघाडीत समेट झाला अन् ठाकरे सेनेचे अशोक जैन यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे ठाकरे सेनेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा काहीसा हिरमोड झाला. कोकणच्या बालेकिल्ल्यात आपल्या पक्षाचा उमेदवार असायला हवा होता, अशी त्यांची इच्छा होती. पण पक्षनेतृत्वाने लोकसभेतील पराभवानंतर सावध पवित्रा घेताना ही जागा काँग्रेसला सोडली आणि काँग्रेस उमेदवाराला अपेक्षित यश मिळवता आले नाही.

पदवीधर निवडणुकीसंदर्भात सांगायचे तर पदवीधर मतदारसंघात ठराविक मतदार असतात. या मतदारसंघात केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेऊनच आखणी केली जाते. मतदार नोंदवले जातात आणि त्याचाच फायदा या मतदानादरम्यान होत असतो. पण पुढची 6 वर्षे निवडून येणाऱ्या उमेदवारावर मतदारांचा थेट दबाव राहात नाही. विधानपरिषदेवर निवडून आणण्यासाठी एकूण वैध मतांच्या प्रमाणात कोटा ठरवून दिला जातो. त्यानुसार यंदा कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे निरंजन डावखरे हे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यांनी गेल्या 6 वर्षातील कालखंडात केलेल्या कार्याचा अहवाल मतदारांपर्यंत पोहोचविला. डावखरे यांच्याकडे गेल्या दोन निवडणुकींचा अनुभव होता. राजकीय पक्ष वरिष्ठ सभागृह अर्थात विधानपरिषदेत आपली ताकद वाढवण्यासाठी अशा निवडणुकांमध्ये जोर लावतात. परंतु एकदा का उमेदवार निवडून आला की, मतदारांचा थेट दबाव नसल्यामुळे पदवीधरांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होतं, असा आजवरचा अनुभव आहे. पदवीधर हे केवळ निवडणुकीपुरतेच विचारात घेतले जातात. यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्या म्हणजे एकूण 13 उमेदवार रिंगणात होते. मात्र यापैकी 11 उमेदवारांना हजार मतांचा आकडा गाठता आला नाही. तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या उमेदवारास 536 मते मिळाली. आश्चर्याची बाब म्हणजे यंदा पदवीधर निवडणुकीत अवैध ठरलेल्या मतांची संख्या 11 हजार 226 इतकी राहिली.

महेंद्र पराडकर

Advertisement
Tags :

.