For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेसविरोधात भाजपची निदर्शने

10:59 AM Aug 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेसविरोधात भाजपची निदर्शने
Advertisement

राज्यपालांवरील खालच्या पातळीवर टीकेचा निषेध : कारवाई करण्याची मागणी

Advertisement

बेळगाव : राज्यपालांविरोधात अवमानकारक वक्तव्य करून ठिकठिकाणी त्यांच्याविरोधात काँग्रेस नेत्यांकडून पुतळे दहन करण्याचे कृत्य सुरू आहे. उच्चपदस्थ व्यक्तीविरोधात अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन काँग्रेसकडून आंदोलन केले जात आहे, असा आरोप करत भाजपकडून सदर काँग्रेस कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत चन्नम्मा चौकात आंदोलन करण्यात आले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात खासगी व्यक्तींकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून प्रकरणाच्या चौकशीला अनुमती दिली आहे. असे असताना काँग्रेसकडून राज्यपालांच्या भूमिकेवर आरोप करत आंदोलन केले जात आहे. राज्यपालांनी कायद्यानुसार घटनात्मक चौकटीत चौकशीचे आदेश दिले असले तरी काँग्रेस याला वैयक्तिक पातळीवर घेऊन जाऊन राज्यपालांविरोधात नको ते आरोप केले जात आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी राज्यपालांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन केले जात आहे. ही अत्यंत खालच्या पातळीवरची टीका आहे, असा आरोप भाजपकडून करण्यात आला.

काँग्रेसच्या या भूमिकेविरोधात भाजपकडून शहरामध्ये चन्नमा चौकात आंदोलन करण्यात आले. काँग्रेसने वाल्मिकी निगममधील मागासवर्गीयांचा निधी इतर योजनांसाठी वळवून मागासवर्गीयांच्या हक्कांवर गदा आणली आहे. त्यांच्यावर अन्याय केला आहे. मागासवर्गीय समाजातील राज्यपालांवर केलेले आरोप कितपत योग्य आहेत? तत्कालिन मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्याविरोधात तत्कालिन राज्यपालांनी चौकशीचे आदेश दिले होते. याला कायद्यानुसारच उत्तर देण्यात आले आहे. असे असताना राज्यपालांच्या भूमिकेवर काँग्रेसकडून घेतलेली भूमिका अत्यंत लज्जास्पद आहे. उच्चपदावर असणाऱ्या राज्यपालांविरोधात नको ते आरोप केले जात आहेत. त्यांच्यावर वैयक्तिकरीत्या टीका करणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी माजी आमदार संजय पाटील, अनिल बेनके, मुरगेंद्रगौडा पाटील, नगरसेवक श्रेयस नाकाडी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते, नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.